Assembly Election 2022: '...तर महाविकास आघाडीही करणार, गोवा अन उत्तरप्रदेशात शिवसेना लढणार'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2022 06:24 PM2022-01-08T18:24:35+5:302022-01-08T18:26:13+5:30
Assembly Election 2022: मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी पाच राज्यातील निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशसह ऊर्वरित चारही राज्यांमध्ये आजपासून निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे.
मुंबई - देशातील उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे बिगुल आज वाजले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेमध्ये या विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केली. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार 7 टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक टप्प्यात सात टप्प्यात मतदान होईल. तर, गोवा आणि पंजाबमध्ये एकाच टप्प्यात मतदान होईल. निवडणुका जाहीर होताच राजकीय पक्षांनी स्वागत केलं आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी पाच राज्यातील निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशसह ऊर्वरित चारही राज्यांमध्ये आजपासून निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. 10 फेब्रुवारी रोजी पहिल्या टप्प्यात मतदान होणार असून 10 मार्च रोजी निकाल घोषित करण्यात येणार आहे. तत्पूर्वी ज्या 5 राज्यांतील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आल्याने राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी आनंद व्यक्त करत निवडणूक आयोगाचे अभिनंदनही केलं आहे.
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी निवडणुक आयोगाचं अभिनंदन करत निवडणुकांच्या घोषणांचं स्वागत केलं. देशातील 5 राज्यांत निवडणुका होत आहेत, ही आनंदाची बाब असून वेळेवर निवडणुका घेण्यात येत असल्यान आयोगाचे अभिनंदन, असे राऊत यांनी म्हटले. तसेच, शिवसेना 5 राज्यांपैकी 2 राज्यात निवडणुका लढवणार आहे. त्यामध्ये राष्ट्रवादीसोबत आघाडीही करणार असल्याचं राऊत यांनी सांगितलं. गोव्यामध्ये महाविकास आघाडी स्थापनेचा आमचा विचार आहे. मात्र, स्थानिक काँग्रेस नेत्यांचं याबाबत एकमत झाल्यानंतरच निर्णय होईल. मात्र, शिवसेना गोवा आणि युपीत निवडणूक लढवणार असल्याची घोषणा राऊत यांनी केली. यावेळी, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावरही टीका केली.
भाजपचाही सरपंच नव्हता
आगामी गोवा विधानसभा निवडणुकीच्या (Goa Election 2022) पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. पश्चिम बंगालमधील तृणमूल पक्षही यावेळी गोव्याच्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. त्यामुळे चुरस आणखी वाढणार असल्याची चर्चा होतेय. त्यातच, गोव्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनाही मैदानात उतरली आहे. मात्र, शिवसेनेचा गोव्यात सरपंचही नाही, असा प्रहार मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केला होता. त्यावर, काही वर्षांपूर्वी गोव्यात भाजपचाही सरपंच नव्हता. आमचे अगोदर आमदार येतील, मग सरपंच, असे संजय राऊत यांनी म्हटले.