मुंबई - देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपाने मोठं यश मिळवलं आहे. पाचपैकी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये भाजपाला आणि पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला मिळालेल्या यशाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. चार राज्यातील जनादेश हा भाजपाच्या बाजूने आला आहे. तर केजरीवालांच्या दिल्लीतील कामगिरीमुळे पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचा विजय झाल आहे. या जनादेशाचा आदर केला पाहिजे. आता पुढच्या काळात आम्ही सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भाजपाविरोधात एक प्रभावी पर्याय देण्यासाठी किमान समान कार्यक्रम तयार केला पाहिजे.
शरद पवार प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, पंजाबमधील शेतकऱ्यांचा राग मतमदानातून दिसला. त्यांनी भाजपाला हरवलं काँग्रेसला हरवलं आणि नव्या पक्षाच्या हातात सत्ता दिली. केजरीवालांच्या दिल्लीतील कामगिरीमुळे पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचा मोठा विजय झाला. लोकांच्या बोलण्यातून केजरीवालांच्या कामांबाबत उत्सुकता दिसत होती. पंजाबमधील निकाल हा भाजपाला अनुकूल नाही आणि काँग्रेससाठीही धक्कादायक आहे, असे शरद पवार म्हणाले.
दरम्यान, गेल्या काही काळातील निवडणुकांचा विचार केला तर आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पश्चिम बंगाल अशा राज्यांमध्ये राज्यांत भाजपेत्तर पक्षांना यश मिळालं आहे. राष्ट्रीय विषयांवर जनतेचं वेगळं मत दिसून येतं. मात्र आपण जनतेने दिलेल्या कौलाचा आदर केला पाहिजे. कारण तो लोकांचा निर्णय असतो, तो स्वीकारला पाहिजे. मात्र या निकालांमुळे विरोधकांनी नाऊमेद होता कामा नये. आता देशातील विरोधी पक्षांनी भाजपाविरोधात प्रभावशाली पर्याय देण्यासाठी किमान समान कार्यक्रम तयार करण्यासाठी एकत्र आले पाहिजे. विरोधकांच्या एकत्र येण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.
दरम्यान, या निवडणुकीत काँग्रेसच्या उडालेल्या घसरगुंडीवर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले की, पंजाबमध्ये काँग्रेस कुठे पडली याबाबत विचार करणे हा काँग्रेसचा प्रश्न आहे. दरम्यान, निकाल सुरू असताना माझी कुठल्याही काँग्रेसच्या नेत्याशी चर्चा झालेली नाही. त्यांच्याशी न बोलता त्यांच्याबाबत बोलणे योग्य ठरणार नाही.