Join us

Assembly Election Results 2022: यूपी, गोव्यात शिवसेना 'फ्लॉप': संजय राऊत म्हणाले 'वेट अँड वॉच'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 10:45 AM

५ राज्यांचे निवडणूक निकालाचे कल समोर येत असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी वेट अँन्ड वॉचची भूमिका घेतली आहे.

मुंबई – देशभरात ५ राज्यांच्या निवडणुकीचे निकाल आता समोर येत आहेत. सुरुवातीच्या मतमोजणी निकालात भाजपाला(BJP) उत्तर प्रदेश, गोव्यात बहुमत मिळत असल्याचं दिसून येते. तर पंजाबमध्ये सत्ताधारी काँग्रेसची अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पक्षानं(AAP) दाणादाण उडवली आहे. पंजाबमध्ये ‘आप’ बहुमत मिळवेल अशी चिन्हे आहेत. तर मणिपूरमध्येही भाजपा बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. उत्तराखंडमध्येही भाजपा सत्ता राखण्याची शक्यता आहे.

५ राज्यांचे निवडणूक निकालाचे कल समोर येत असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी वेट अँन्ड वॉचची भूमिका घेतली आहे. संजय राऊत(Shivsena Sanjay Raut) म्हणाले की, मतमोजणीला आत्ताच सुरूवात झाली आहे. पोस्टाद्वारे मतमोजणी होतात त्यावर कल कळत नाही. आघाडी, पिछाडी चालत राहील. सुरुवातीचे कल येत आहेत. लहान राज्यांचे निकाल दुपारी २ वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होईल. तर उत्तर प्रदेशचे निकाल स्पष्ट व्हायला ५ वाजेपर्यंत वाट पाहावी लागेल. थोडं थांबा. अजून अनेक राऊंड मतमोजणी सुरू होणार आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच गोव्यात कुणाला बहुमत मिळणार नाही. गोव्यात घोडेबाजार होणार नाही. आमचं काँग्रेस नेते पी. चिंदबरम यांच्याशी बोलणं झालं आहे. त्यांना हवी ती मदत करण्यासाठी आम्ही तयार आहोत. तर उत्तर प्रदेशात योगी पुढे जाणारच होते पण समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव आणि त्यांचे मित्रपक्ष चांगली कामगिरी करत आहे. निकाल यायला वेळ आहे. मतमोजणी पूर्ण होईल. संपूर्ण निकाल आल्यानंतर सविस्तर बोलू असंही संजय राऊत म्हणाले आहेत.(Goa Election Result 2022)

दरम्यान, शिवसेनेच्या उमेदवारांपेक्षा NOTA ला जास्त मतदान होतंय त्यावर संजय राऊतांनी म्हटलं की, लोकांना नोटाला का मतदान करावं लागतंय याचा विचार सगळ्या राजकीय पक्षांनी केला पाहिजे. कुठल्याही राजकीय पक्षाला राज्याबाहेर जाताना संघर्ष करावा लागतो. आम्ही गोवा, यूपीत काम केले होते. शिवसेनेची महाराष्ट्राबाहेर ही आमची सुरुवात आहे. आम्हाला संघर्ष, धडपड करावी लागतेय. आम्ही थांबणार नाही. येणाऱ्या काळात लोकसभा निवडणूक लढवू असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.   

टॅग्स :गोवा विधानसभा निवडणूक निकाल २०२२उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल २०२२शिवसेनासंजय राऊत