मुंबई - ५ राज्यांचे निकाल निराशाजनक आणि वैफल्यग्रस्त करणारे आहेत. परंतु हा निकाल संपूर्ण अनपेक्षित होते असं मानणार नाही. निकालावर प्रदीर्घ चर्चा करणं गरजेचे आहे. काँग्रेसला नेतृत्व मिळालं पाहिजे. आम्ही २३ जणांनी पत्रात जे मुद्दे उपस्थित केले होते. त्यावर चर्चा व्हायला हवी. सोनिया गांधींसोबत आम्ही चर्चा केली परंतु त्यावर गंभीर चर्चा झाली नाही. राजकीय पक्षाला संघटन मजबूत करायला हवं. मात्र त्यावर काँग्रेस कमी पडली. काँग्रेसनं जे काही निर्णय घेतले ते लोकांना आवडले नाही. लोकांनी त्याचा राग काँग्रेसवर काढला हे स्पष्ट आहे अशा शब्दात माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण(Congress Prithviraj Chavan) यांनी निकालावर भाष्य केले आहे.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, बहुमत मिळूनही गोव्यात मागील वेळी सत्ता मिळवता आली नाही. त्यामुळे अनेकजण पक्ष सोडून भाजपात गेले. भाजपाची ताकद वाढली त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत नवख्या उमेदवारांना घेऊन निवडणूक लढवावी लागली. पंजाबमध्ये नेतृत्वबदलाच्या घटना घडत गेल्या. जातीय धोरणावर समीकरण बदलत गेली. जी काँग्रेसच्या मूळ धोरणेत नव्हती. तरीही त्यात यश आलं नाही. काँग्रेस नेतृत्वाची जी पोकळी निर्माण झाली. त्यामुळे असे निकाल लागले असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत उत्तर प्रदेशात प्रियंका गांधी एकट्या लढत होत्या. परंतु पक्षाची ताकद त्यांना मिळाली नाही. इतर २५ राज्यांत काँग्रेस नेते मोकळे होते. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ४-५ मंत्री, आमदार, खासदार त्यांनी पाठवायला हवं होतं. ३-४ महिने तळ ठोकून राहायला हवं होतं. परंतु असं काही झालं नाही. पराभूत मानसिकतेतून काँग्रेसनं निवडणूक लढवली. उत्तराखंडमध्ये काँग्रेसला संधी होती. परंतु त्याठिकाणी हरिश रावत यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा बनवलं नाही. मध्यंतरी तिथं काही घडामोडी घडल्या. रावत पक्ष सोडून निघाल्याची चर्चा होत होती असाही खुलासा पृथ्वीराज चव्हाणांनी केला.
दरम्यान, आम आदमी पक्ष राष्ट्रीय पर्याय बनेल असं वाटत नाही. दिल्लीत जे काम केले त्याचा परिणाम पंजाबमध्ये झालं. परंतु दिल्लीत कायदा-सुव्यवस्था केंद्राकडे असते. श्रीमंत राज्य असल्याने महसूल जास्त मिळतो. त्यांनी शिक्षण-आरोग्यावर जास्त खर्च केले. मात्र पंजाबची परिस्थिती वेगळी आहे. ‘आप’ला त्याठिकाणी काम करावं लागेल असंही पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितले.