लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्यात १२ जागांवर जिंकलेली ‘उबाठा जीत का जश्न’ साजरी करत आहे. मात्र उबाठाचे उमेदवार काँग्रेसच्या व्होट बँकेमुळे जिंकले आहेत. काँग्रेसच्या मतदारांनी त्यांना तारले आहे, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केली. तसेच मुस्लिम मतांमुळेच उबाठाचे उमेदवार जिंकल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापनदिनानिमित्त वरळी येथील एनएससीआय डोम येथे शिंदेसेनेच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली. उद्धव ठाकरे आम्ही जिंकलो असे म्हणत आहेत. मात्र शिवसेनेचा मतदार त्यांच्याबरोबर राहिला आहे का? मुंबईत त्यांच्यापेक्षा सव्वादोन लाख अधिक मते आम्हाला मिळाली. शिवसेनेचा मतदार दुसरीकडे गेला नाही. तो आपल्याकडेच आला.
वरळीत उद्धवसेनेचे मताधिक्य घटले. त्यावरून शिंदे यांनी उद्धवसेनेला लक्ष्य केले. काहींनी मतांसाठी फतवे काढले. आता त्यांना ओवेसीपेक्षा उबाठा जवळची वाटत आहे. वरळीत त्यांना केवळ ६ हजारांचे मताधिक्य मिळाले. विधानसभेला एवढीही मते मिळणार नाहीत, असेही ते म्हणाले.
शिवसेना नाव, चिन्ह बाजूला ठेवून दाखवा; उद्धव ठाकरे यांचे शिंदेसेनेला आव्हान
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : लोकसभा निकालानंतर पहिल्या जाहीर कार्यक्रमात शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापनदिनी उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह बाजूला ठेवून शिवसेनाप्रमुखांचा फोटो न लावता निवडणुकीला सामारे जा, नाहीतर विजेते म्हणून फिरू नका, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदेसेनेला दिले.
उद्धवसेनेच्या वतीने ५८ वा वर्धापनदिन माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात साजरा करण्यात आला. यावेळी ठाकरे यांनी लोकसभेचा निकाल व आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदेसेनेवर टीका केली. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या शहरी नक्षलवादाच्या टीकेवर बोलताना सत्तेचा दुरुपयोग करून पक्ष फोडणे, यंत्रणांचा धाक दाखवून विरोधकांना संपवणे हा शासकीय नक्षलवाद आहे, असे प्रत्युत्तर दिले. लोकशाही वाचवण्यासाठी लढणे हा आतंकवाद असेल तर मी आतंकवादी आहे, असा टोला लगावतानाच माझ्या वडिलांचा फोटो चोरता व स्ट्राइक रेट कसला सांगता, असा सवालही त्यांनी केला.