कुर्ल्यातले मतदार पक्षबदलाची परंपरा राखणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 07:31 AM2019-08-20T07:31:04+5:302019-08-20T07:35:25+5:30

कुर्ला हा दरवर्षी नव्या आमदाराला निवडून देणारा मतदारसंघ.

Assembly Elections 2019 Political situation in kurla | कुर्ल्यातले मतदार पक्षबदलाची परंपरा राखणार?

कुर्ल्यातले मतदार पक्षबदलाची परंपरा राखणार?

Next

- नितीन जगताप

मुंबई - कुर्ला हा दरवर्षी नव्या आमदाराला निवडून देणारा मतदारसंघ. आत्तापर्यंत या मतदारसंघातून कोणत्याही उमेदवाराला दोनदा विजयाची किंवा कोणत्याही राजकीय पक्षाला सलग दोनदा ‘गड’ राखण्याची संधी मिळालेली नाही. मात्र, यंदा शिवसेना-भाजपा युती राज्यातील सर्व जागा जिंकण्याची मनिषा बाळगून असल्यामुळे, कुर्ला मतदारसंघातील मतदारांचा ‘पायंडा’ ते मोडू शकतील काय, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

२००८ मध्ये पुनर्रचनेमध्ये हा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव झाला. या मतदारसंघात मराठी, गुजराती, दक्षिण भारतीय, राजस्थानी, दलित अशा संमिश्र मतदारांचे प्राबल्य आहे. निम्नवर्गीय आणि निम्न मध्यमवर्गीय मतदारांची संख्या येथे अधिक आहे. मात्र, मोठ्या प्रमाणावर झालेली अनधिकृत बांधकामे आणि त्याकडे राजकीय नेत्यांचे होणारे दुर्लक्ष, यामुळे कुर्ल्याचा ‘विकास’ रखडल्याचे चित्र आहे.

२००९ च्या विधानसभा निवडणुकीत नव्याने स्थापन झालेल्या ‘मनसे’ला साथ देत, कुर्ल्यातील मतदारांनी मिलिंद कांबळे यांना सुमारे सात हजार मतांच्या फरकाने निवडून दिले. मात्र, २०१४ साली मनसेचा प्रभाव ओसरला. त्यात सर्वच पक्षांनी स्वबळाचा नारा दिल्याने मोठ्या प्रमाणात मतविभाजन झाले आणि त्याचा फायदा सेनेच्या मंगेश कुडाळकर यांना झाला. पुनर्रचनेनंतर प्रथमच येथे शिवसेनेचा भगवा फडकला. त्यामुळे कुडाळकर यांचे ‘मातोश्री’वरील वजन वाढले असले, तरी मतदारसंघातल्या दोघा नगरसेवकांनी पुन्हा पाठिंबा देण्यास नकार दिल्याने त्यांच्यासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

दुसरीकडे, भाजपामधून विजय कांबळे, श्रीकांत भीसे, प्रकाश मोरे इच्छुकांच्या शर्यतीत आहे. २०१४ साली विजय कांबळे यांनी राष्ट्रवादीतून भाजपामध्ये दाखल होत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविली होती. मात्र, युती अबाधित राहिल्यास त्यांना उमेदवारी मिळणे अशक्य आहे, तर हा मतदारसंघ राखीव असल्यामुळे रिपाइंचे (आ) गौतम सोनावणे या जागेसाठी आग्रही आहेत.

राष्ट्रवादीतून मिलिंद कांबळे इच्छुक आहेत. मात्र, गेल्या निवडणुकीत त्यांचे डिपॉझिट जप्त झाले होते. त्यामुळे पक्षश्रेष्ठींकडून दुसऱ्या उमेदवाराचा शोध सुरू आहे. गेल्या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या एमआयएमकडूनही तुल्यबळ उमेदवाराचा शोध सुरू आहे. कारण २०१४ ला मराठी उमेदवार दिल्याने मुस्लीम मतदारांनी एमआयएमकडे पाठ फिरविली होती.

विद्यमान आमदाराची पडती बाजू

२०१४ मध्ये मंगेश कुडाळकर पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून गेले. मात्र, मतदारसंघातील अनधिकृत बांधकामांना अटकाव करण्यात अपयश, विकासकामांकडे दुर्लक्ष आणि स्थानिक नगरसेवकांचा वाढता विरोध; त्याचप्रमाणे, नवीन सहकारनगरमधील म्हाडाच्या भूखंडावर अनधिकृत बांधकामे करण्यात त्यांचा सहभाग असल्याच्या आरोपामुळे, त्यांचे आमदारकीचे स्वप्न पुन्हा धोक्यात आल्याचे बोलले जात आहे.

‘रिपाइं’चा कुर्ल्यासाठी आग्रह

या मतदारसंघात पालिकेचे सहा विभाग येतात. यामध्ये भाजपचे दोन, शिवसेनेचे दोन आणि राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक आहेत. त्यामुळे शिवसेना भाजपचे पारडे जड आहे. मात्र, रिपाइंचे नेते आणि समाज कल्याण राज्यमंत्री अविनाश महातेकर यांना मानणारा मोठा वर्ग तेथे असल्याने रिपाइंने या जागेसाठी आग्रह धरला आहे.

 

Web Title: Assembly Elections 2019 Political situation in kurla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.