Join us

Assembly Elections 2022 Result: 'भाजपला पराभूत करणे म्हणजे भींतीवर डोकं आपटण्यासारखं'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 1:30 PM

देशातील मिनी लोकसभा म्हणून पाहिलं जात असलेल्या 5 राज्यांच्या निकालात काँग्रेसची मोठी पिछेहाट झाली असून भाजपने पुन्हा एकदा मुसंडी मारली आहे.

मुंबई - आंध्र प्रदेशात जगनमोहन रेड्डी, प. बंगालमध्ये ममता बॅनर्जी, नवीन पटनायक यांसारख्या नेत्यांमध्ये आणखी एक नाव जोडले गेले ते म्हणजे अरविंद केजरीवाल(Arvind Kejariwal). आम आदमी पक्षाने पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा (Congress) सुपडा साफ केला आहे. तर, उत्तर प्रदेशात भाजपला बहुमत मिळत असल्याचे दिसून येते, गोवा आणि उत्तराखंडमध्येही भाजपच पुढे चालत आहे. त्यामुळे, पाच राज्यांच्या निकालात पंजाब वगळता इतर ठिकाणी कमळाने बाजी मारल्याचं चित्र आहे. या निकालासंदर्भात प्रतिक्रिया देताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आनंद व्यक्त केला आहे.   

देशातील मिनी लोकसभा म्हणून पाहिलं जात असलेल्या 5 राज्यांच्या निकालात काँग्रेसची मोठी पिछेहाट झाली असून भाजपने पुन्हा एकदा मुसंडी मारली आहे. पंजाबमध्ये आपने स्पष्ट बहुमत मिळवत काँग्रेसचा दारुण पराभव केला. या निकालानंतर देशभर भाजप समर्थकांनी आनंद व्यक्त करत जल्लोष केला आहे. देशातील सर्वात मोठं राज्य असलेल्या युपीत भाजपने पुन्हा विजय मिळवल्याचे चित्र दिसून येते. या 5 राज्यांच्या निकालासंदर्भात चंद्रकात पाटील यांनी आपल मतं मांडलं आहे.  'एक परिपक्व राजकीय नेता म्हणून मी निकालावर लगेच मत मांडणं योग्य नाही. पण, सध्या जे चित्र दिसत आहे, त्यावरुन 5 पैकी 4 राज्यांत भाजपच विजयी होईल. युपीत सर्व महिलांना भाजपला मतदान केलं असेल आणि पुरुषांनी समाजवादी पक्षाला, असेही पाटील यांनी म्हटले. तसेच, भाजपला पराभूत करणं म्हणजे भिंतीवर डोकं आपटण्यासारखं आहे,' असेही ते म्हणाले. 

उत्तर प्रदेशात भाजपची सरशी

उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांच्या नेतृत्वाखालील भाजपाने (BJP) धडाकेबाज विजयाच्या दिशेने आगेकूच केली. सकाळी मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर पहिल्या चार तासांतच चित्र जवळपास स्पष्ट झालं. भाजपाने ४०३ पैकी २५०+ जागांवर आघाडी मिळवली. भाजपाच्या विजयाचं चित्र स्पष्ट होताच नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली. यूपीच्या जनतेने रामराज्याची निवड केली असं मत खासदार रवि किशन (Ravi Kishan) यांनी व्यक्त केलं. 

टॅग्स :चंद्रकांत पाटीलनिवडणूकभाजपाउत्तर प्रदेश