देशात लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत. ४ जून रोजी लोकसभेचा निकाल येणार आहे, त्याआधीच आता राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीत आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीबाबत आढावा घेण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.
४ जूनला मतमोजणी, १ जूनला इंडिया आघाडीची मोठी बैठक; केजरीवाल, स्टॅलिन यांना निमंत्रण
राज्यात दिवाळीपूर्वीच विधानसभा निवडणुकीचे मतदान होणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे आता राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. राज्यातील लोकसभेचे मतदान संपल्यानंतर युती आणि आघाडीच्या नेत्यांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाची चर्चा सुरू झाली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज मुंबईत पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत विधानसभा निवडणुकांबाबत चर्चा होणार असल्याचे बोलले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडून काही महिने झाले. पक्ष फुटीनंतर अजित पवार पहिल्याच सभेत विधानसभा निवडणुकीत ९० जागा लढणार असल्याचे जाहीर केले होते. महायुतीमध्ये आता पुन्हा एकदा जागावाटपाची चर्चा सुरू झाल्याचे बोलले जात आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या वाटेला ४ जागा आल्या होत्या. आता विधानसभा निवडणुकीत किती जागा मिळणार या चर्चा सुरू आहेत.
भाजपामध्येही बैठकांचा धडाका सुरू
राज्यात लोकसभा निवडणुकांसाठीचे मतदान संपताच आता भाजपानेही विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा धडाका सुरू केला आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला १५ जागा मिळाल्या होत्या. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ४ जागा मिळाल्या. तर भाजपाने २९ जागा लढवल्या आहेत.
महाविकास आघाडीचे जागावाटप
महाविकास आघाडीने राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी ४८ उमेदवार दिले होते. यात शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला २१, काँग्रेसला १७ आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला १० जागा मिळाल्या होत्या.