मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल, असे भाकित राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी वर्तवले आहे. शनिवारी (21 जुलै) मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते. ''शिवसेना नेत्यांची भाजपाकडून अवहेलना केली जात आहे. त्यामुळे शिवसेनेचे मंत्री आणि आमदार नाराज आहेत. सध्या ते संभ्रामवस्थेत असून काय करावं हे त्यांना सुचत नाहीय. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल'', असे अजित पवार यांनी म्हटले.
(भुजबळांनी पवारांच्या उपस्थितीत शिवसेनेचे केले कौतुक)
तर दुसरीकडे, शरद पवार यांच्या उपस्थितीतच छगन भुजबळ यांनी शिवसेनेचे कौतुक केले. शिवसेना मुंबईत पाय रोवून उभी आहे कारण त्यांनी त्यांचे वॉर्ड जनसंपर्काच्या माध्यमातून बांधून ठेवले आहेत. शिवसेनेचे कार्यकर्ते प्रत्येक प्रश्नावर आंदोलन करतात. आपले कार्यकर्ते फक्त आदेश मागतात. यापुढे आदेश मागत फिरु नका. एकतर नमस्कार करा नाहीतर चमत्कार दिसेल असे काम करा, या शब्दात मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची कानउघडणी करत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी शिवसेनेचे कौतुक केले.
मुंबईत शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यर्त्यांसाठी मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली हे शिबीर पार पडले. यावेळी अजित पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्षा फौजिया खान, छगन भुजबळ, उपाध्यक्ष नवाब मलिक, दिलीप वळसे पाटील, महिला प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ आदी नेत्यांची भाषणे झाली.