मुंबई - राज्याच्या विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन यंदा मुंबई येथे पार पडत आहे. गोंधळ आणि आरोप-प्रत्यारोपांच्या वातावरणात अधिवेशनात कायदे समंत होत आहेत. महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांसाठी अत्यंत कठोर शिक्षेची तरतूद असणारे ‘शक्ती’ विधेयक गुरुवारी विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले. विधान परिषदेत विधेयक शुक्रवारी येईल. राज्यपाल व राष्ट्रपतींच्या अधिसंमतीनंतर या कायद्याची अंमलबजावणी होईल. या अधिवेशनात विरोधक जास्त आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. तसेच, कमी कालावधीसाठी अधिवेशन घेतले जात असल्यावरुनही टीका होतेय.
भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी अधिवेशनाच्या कमी कालावधीवरुन महाविकास आघाडी सरकावर टीका केली आहे. तसेच, अधिवेशनात परीक्षा आणि भरती घोटाळ्यावरुनही आम्ही सरकारला धारेवर धरणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ''विधिमंडळाचं अधिवेशन कमी वेळात उरकणं हे लोकशाहीला धरुन नाही. लोकशाहीची पायमल्ली करण्याचंच सत्ताधाऱ्यांनी ठरवलं आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीबाबत काय निर्णय होतो ते पाहून आम्ही पुढील निर्णय घेऊ, असेही पाटील यानी म्हटले.
राज्यातील भरती परीक्षांच्या पेपर फुटी प्रकरणी ठाकरे सरकार विरोधात आम्ही आक्रमक भूमिका घेणार आहोत. पेपर फुटीवर आम्ही प्रचंड आक्रमक होणार आहोत. सगळी क्रोनॉलॉजी, घटनाक्रम देवेंद्र फडणवीस यांनी मांडला आहे. सरकार गेंड्याच्या कातडीचं आहे, सीबीआय चौकशी नको म्हणताय तर कुठली तरी चौकशी लावा, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, विधिमंडळाचे अधिवेशन 22 डिसेंबर रोजी सुरू झाले असून 28 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. अधिवेशन कालवधी वाढविण्यासंदर्भातही निर्णय घेतला जाऊ शकतो. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही प्रकृती स्वास्थतेमुळे अनुपस्थित आहेत. त्या पार्श्वभूमीवर अधिवेशन कालावधी वाढणार का नाही, हे पाहावे लागणार आहे.