Rahul Narwekar On Mla Disqualification Verdict:शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महत्त्वाचा निकाल दिला. मात्र, यानंतर आता यावरून शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांनी नाराजीचा सूर लावला आहे. शिवसेना शिंदे गटाने मुंबई उच्च न्यायालयात आणि ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. यावर राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना राहुल नार्वेकर म्हणाले की, कोणालाही संतुष्ट करण्यासाठी हा निकाल दिलेला नाही. कायद्याला धरूनच हा निकाल दिला. कायद्याच्या अनुषंगाने आणि संविधानातील तरतुदींचे पालन करून तसेच सर्वोच्च न्यायलयाच्या तत्वांच्या आधारावर हा निकाल दिला आहे, असे राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले. आपल्या देशात कोणताही नागरिक संविधानाच्या कलम २२६ आणि कलम ३२ अंतर्गत सर्वोच्च न्यायालयात किंवा उच्च न्यायालयात निश्चितपणे दाद मागू शकतो, असे राहुल नार्वेकर यांनी सांगितले.
...तरच अपात्रतेचा निर्णय मागे घेतला जाऊ शकेल
शिंदे गट आणि ठाकरे गट यांनी याचिका दाखल केली म्हणजे आमदार अपात्रता प्रकरणात दिलेला निर्णय अयोग्य ठरला असे होत नाही. हा निर्णय अयोग्य ठरवण्यासाठी त्यात काही नियमबाह्य आहे का? त्यात काही घटनाबाह्य आहे का? अथवा काही बेकायदेशीर घडले का? ते न्यायालयाला दाखवावे लागेल. तसे सिद्ध केले तरच तो निर्णय रिव्हर्स होऊ शकेल, असे मत राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केले.
दरम्यान, शिवसेनेत अभूतपूर्व बंडखोरी झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय घटनेतील नियमानुसार विधानसभा अध्यक्षांवर सोपवला होता. तब्बल सात महिन्यांनी विधानसभा अध्यक्षांनी याप्रकरणी निकाल दिला. राहुल नार्वेकर यांनी खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच असल्याचा निर्वाळा दिला. शिंदे गटातील आमदारांना पात्र ठरवले. त्याचबरोबर ठाकरे गटातील आमदारांनाही पात्र ठरवले.