‘स्वाध्याय’च्या माध्यमातून ऑनलाइन शिक्षणासंदर्भात होणार मूल्यमापन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2020 02:36 AM2020-11-04T02:36:42+5:302020-11-04T02:37:05+5:30
online education : दर शनिवारी स्वाध्यायच्या माध्यमातून पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या सुरुवातीला मराठी आणि गणित विषयाच्या व्हॉट्सॲपच्या माध्यमातून चाचण्या होतील.
मुंबई : गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून विद्यार्थी ऑनलाइनशिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना ऑनलाइनशिक्षणामुळे नेमके किती आणि काय आकलन होत आहे याच्या चाचपणीसाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने स्वाध्याय उपक्रमाचे आयोजन केले आहे.
दर शनिवारी स्वाध्यायच्या माध्यमातून पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या सुरुवातीला मराठी आणि गणित विषयाच्या व्हॉट्सॲपच्या माध्यमातून चाचण्या होतील. विद्यार्थ्यांचा कोणताही निकाल किंवा शिक्षकांचे मूल्यमापन केले जाणार नाही. स्वाध्याय उपक्रमाचे उद्घाटन मंगळवारी शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड यांनी केले. दर शनिवारी विद्यार्थ्यांना गणितातील १० आणि भाषेतील १० प्रश्न सरावासाठी पाठवले जातील. त्तरे देताच लगेचच त्यांच्या कामगिरीचा अहवाल दिला जाईल.
एका स्मार्टफोनद्वारे १०० विद्यार्थ्यांची चाचणी
- स्वाध्याय या उपक्रमाचा फायदा म्हणजे एका स्मार्टफोनद्वारे १०० विद्यार्थी यावर चाचण्या देऊ शकतील. म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांकडे, पालकांकडे स्मार्टफोन नाहीत तेही या उपक्रमात सामील होऊ शकतात. शिक्षक, स्वयंसेवक, एसएमसी सदस्य, गावातील किंवा वस्तीपातळीवरील स्थानिक तरुण हे यासाठी मदत करू शकतात.
- संकलित केलेली माहिती डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी सामंजस्य करार केला जाईल. माहितीबाबत कोणत्याही गैरप्रकारांबद्दल कठोर कारवाई आणि दंड आकारला जाईल.