मुंबई : महापालिकेकडे मालमत्ता कर डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे अदा करता यावा, यासाठी नागरिकांना आता ‘पीओएस’च्या माध्यमातून आणखी एक पर्याय सोमवारपासून उपलब्ध झाला आहे. मुंबई महापालिकेतर्फे नागरी सुविधा केंद्रांमध्ये पीओएस यंत्रे कार्यान्वित करण्यात आली असून, महापालिका मुख्यालयातील नागरी सुविधा केंद्रात या सुविधेचे आयुक्त अजय मेहता यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण झाले.महापालिकेच्या सर्व २४ विभाग कार्यालयांमध्ये महापालिकेची नागरी सुविधा केंद्रे आहेत. त्याचबरोबर महापालिका मुख्यालयातही एक नागरी सुविधा केंद्र आहे. या सर्व २५ नागरी सुविधा केंद्रांमध्ये प्रत्येकी ४, यानुसार सर्व २५ नागरी सुविधा केंद्रांमध्ये १०० पीओएस यंत्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. या सर्व पीओएस यंत्रांद्वारे पहिल्या टप्प्यात नागरिकांना मालमत्ता कर त्यांच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.दुसऱ्या टप्प्यात नागरिकांना पाण्याचे बिल अदा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात विविध प्रकारच्या सेवा सुविधांसाठी महापालिकेकडे जमा करावयाचे शुल्क पीओएसच्या साहाय्याने डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे भरता येणार आहे. आॅनलाइन बँकिंगद्वारे कर अदा करण्याची सुविधा नागरिकांना यापूर्वीच महापालिकेने उपलब्ध करून दिली आहे. (प्रतिनिधी)
मालमत्ता करही भरा ‘कॅशलेस’
By admin | Published: January 10, 2017 7:08 AM