रक्त चंदन तस्कराची ७२ कोटींची मालमत्ता जप्त - ईडीची कारवाई
By मनोज गडनीस | Published: March 12, 2024 05:42 PM2024-03-12T17:42:18+5:302024-03-12T17:44:31+5:30
२००८ ते २०१० तसेच २०१४ व २०१५ या कालावधीमध्ये देशात व परदेशात या टोळीने रक्तचंदनाची तस्करी करत ९४ कोटी रुपयांची माया गोळा केली होती.
मुंबई - विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये (एसईझेड) कार्यरत कंपन्यांची कागदपत्रे जमा करत त्या कागदपत्रांच्या आधारे रक्त चंदनाची तस्करी करणाऱ्या एका टोळीला ईडीने (सक्तवसुली संचालनालय) दणका देत त्यांची ७२ कोटी ४५ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, बादशाह माजिद मलिक, विजय सुबान्ना पुजारी आणि त्यांच्या टोळीतील काही साथीदारांनी एसईझेडमध्ये रंग, चिकट द्राव व रेडिएटर आदी मालांची निर्मिती करून त्यांचे वितरण करणाऱ्या कंपन्यांच्या मालाच्या वहनाची कागदपत्रे गोळा केली. या कागदपत्रांच्या आधारे त्या मालाऐवजी रक्त चंदनाची तस्करी सुरू केली होती. २००८ ते २०१० तसेच २०१४ व २०१५ या कालावधीमध्ये देशात व परदेशात या टोळीने रक्तचंदनाची तस्करी करत ९४ कोटी रुपयांची माया गोळा केली होती. मात्र, तस्करीचा हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. परंतु, तस्करीच्या माध्यमातून गोळा केलेल्या पैशांची फिरवाफिरवी करण्यासाठी त्यांनी बनावट कंपन्यांची स्थापना करत अन्य उद्योगात तो पैसे वळवल्याचे दिसून आले. त्यानंतर, ईडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला व यातील प्रमुख आरोपींना अटक केली. त्यांच्या चौकशी दरम्यान पुढे आलेल्या माहितीच्या आधारे त्यांच्या मालमत्तांची जप्तीची कारवाई ईडीने केली.