मुंबई : ऑनलाइन ॲपच्या माध्यमातून ग्राहकांना सट्टेबाजीची सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या आणि कालांतराने लोकांचे पैसे घेऊन फरार झालेल्या सट्टा-मटका ॲपला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दणका देत त्यांची ८ कोटी ८० लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये १० स्थावर मालमत्ता तर पाच बँक खात्यांमध्ये जमा असलेल्या रकमेचा समावेश आहे.
प्राप्त माहितीनुसार, लोकेश वर्मा आणि राजा वर्मा या दोघांनी सट्टा-मटका व धनगेम्स अशा दोन ॲपची निर्मिती केली होती. याद्वारे सट्टेबाजीचे विविध खेळ खेळत लोकांना पैसे मिळवता येत होते. मात्र, याकरिता या ॲपमध्ये तयार करण्यात आलेल्या वॉलेटमध्ये ग्राहकांना पैसे भरावे लागत होते.
हे ॲप सुरुवातीचे काही महिने व्यवस्थित सुरू होते. त्यानंतर मात्र हे ॲप इंटरनेटवरून गायब झाले. देशभरातील हजारो लोकांचे कोट्यवधी रुपये घेऊन ही कंपनी फरार झाली. या प्रकरणी सर्वप्रथम मध्य प्रदेश येथे पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. मात्र, याची देशव्यापी व्याप्ती लक्षात घेत ईडीने हा तपास सुरू केला होता. या कंपनीने एकूण २५ कोटी रुपयांचा अपहार केल्याचे निदर्शनास आले असून, यापैकी ८ कोटी ८९ लाख रुपयांच्या मालमत्तेची जप्ती शुक्रवारी उशिरा ईडीने केली आहे.