Join us

हजार कोटींचा अपहार करणाऱ्या कंपनीची १८५ कोटींची मालमत्ता जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2021 4:05 AM

ईडीची मुंबई, दिल्लीसह ११ ठिकाणी छापेलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बनावट दस्ताऐवज व संगनमत करून बँकांना हजारो कोटी ...

ईडीची मुंबई, दिल्लीसह ११ ठिकाणी छापे

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : बनावट दस्ताऐवज व संगनमत करून बँकांना हजारो कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या मुंबईतील एका कंपनीची १८५ कोटींची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केली आहे. फ्रॉस्ट इंटरनॅशनल लिमिटेड असे तिचे नाव असून मुंबईसह कानपूर, दिल्ली, गुरुग्राम, मुंबई, कोलकाता आणि तमिळनाडूतील ठिकाणी छापे टाकून ही मालमत्ता जप्त करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.

तिच्या काही सहयोगी कंपन्यांच्या मालमत्ताही जप्त करण्यात आल्या आहेत. मनी लँड्रिगअंतर्गत गुन्हा दाखल करून बुधवारी जप्तीची कारवाई करण्यात आली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. मे. फ्रॉस्ट इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीने विविध १४ बँकांच्या समूहातून बनावट कागदपत्रे, व्यवहार करून तब्बल ३,५९२ कोटी कर्ज घेतले होते. ही रक्कम अन्य कागदोपत्री अस्तित्वात असलेल्या अन्य कंपन्यांच्या खात्यावर वर्ग केली होती. त्याचे संचालक असलेल्या कंपनीकडून त्याच्या आधारे अन्य मालमत्ता खरेदी करण्यात आल्या होत्या. त्यानंतर या कंपनीने नुकसान झाल्याचे दाखवून बँकांचे कर्ज बुडविण्यात आले, अशी माहिती प्राथमिक तपासून समोर आल्यानंतर गेल्यावर्षी जानेवारीत केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाने (सीबीआय) या व तिच्या सहयोगी कंपन्यांवर गुन्हा दाखल केला होता. ईडीनेही मनी लँड्रिगअंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. तिच्या सहयोगी कंपन्यांच्या मालमत्ताही जप्त करण्यात आल्या आहेत. ग्लोबिझ एक्झिम प्रा. लि., एनएसडी निर्माण प्रा. लि., आर. एस. बिल्डर्स यांचा त्यात समावेश आहे. या कंपन्यांचे प्रवर्तक आणि संचालकांच्या मालमत्ताही जप्त करण्यात आल्या आहेत.