मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ‘म्हाडा’तील सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या मे मधील एक/दोन दिवसांच्या वेतन कपातीच्या माध्यमातून जमा झालेला ३१ लाख ५० हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला आहे.
‘बार्टी’मध्ये भरती
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे येथे विभागप्रमुख (योजना - १ विस्तार सेवा - १) - दोन पदे, निबंधक एक पद, कार्यालय अधीक्षक सात पदे अशा एकूण दहा पदांसाठी भरती होणार आहे. ही पदे राज्य व केंद्र शासनाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यामधून प्रतिनियुक्तीने भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
मार्जिन मनी उपलब्ध
मुंबई : स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत राष्ट्रीयीकृत बँकांनी मंजूर केलेल्या प्रकरणांमध्ये अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांतील पात्र नवउद्योजक लाभार्थ्यांकरिता मार्जिन मनी उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने योजनेच्या अटी व शर्ती तसेच लाभार्थ्यांनी प्रस्तावासोबत सादर करावयाच्या कागदपत्रांची सुची निर्गमित केली आहे. शासन निर्णय शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून, सवलतीस पात्र नवउद्योजकांना मार्जिन मनी अनुदान रक्कम राज्य शासनामार्फत देण्यात येते.
कर्ज योजनेबाबत आवाहन
मुंबई : कोविड - १९ महामारीत ज्या अनुसूचित जातीच्या कुटुंबप्रमुखाचा मृत्यू झाला आहे, त्या कुटुंबीयाचे पुनर्वसन करण्यासाठी व्यवसायासाठी कर्ज देण्याची योजना महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत किमान एक ते पाच लाख रूपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकणार आहे. यामध्ये एनएफडीसी, दिल्लीचा ८० टक्के सहभाग असून, भांडवली अनुदान २० टक्के मिळणार आहे. या योजनेचा कर्ज परतफेडीचा कालावधी सहा वर्षे असणार आहे.