बोंडअळीग्रस्तांना मदत थेट खात्यात जमा होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 02:40 AM2018-02-26T02:40:38+5:302018-02-26T02:40:38+5:30
गेल्या वर्षी खरीप हंगामामध्ये कापूस पिकावर बोंडअळी, तसेच धानपिकावर तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे नुकसान झालेल्या शेतक-यांसाठी राज्य शासनाने मदत जाहीर केली आहे.
मुंबई : गेल्या वर्षी खरीप हंगामामध्ये कापूस पिकावर बोंडअळी, तसेच धानपिकावर तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे नुकसान झालेल्या शेतक-यांसाठी राज्य शासनाने मदत जाहीर केली आहे. ३४ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या कोरडवाहू क्षेत्रासाठी ६ हजार ८०० रुपये, तर बागायत क्षेत्रासाठी १३ हजार ५०० रुपये प्रतिहेक्टर मदत देण्यात येणार आहे.
यासंबंधीचा शासन निर्णयही जारी करण्यात आले असून मदतीची रक्कम संबंधित नुकसानग्रस्त शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्यातून बँकेने कोणत्याही प्रकारची वसुली करू नये, असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.
प्रधानमंत्री पीकविमा योजनेखाली झालेल्या पीककापणी प्रयोगानुसार, सर्व कापूस व धान उत्पादक शेतकºयांना कमाल दोन हेक्टरपर्यंतच्या क्षेत्रासाठी मदत देण्यात येणार असून किमान रक्कम एक हजारपेक्षा कमी असणार नाही. तसेच पीकविमा घेतलेल्या शेतकºयांना नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही स्वतंत्रपणे कृषिविभागाकडून करण्यात येणार आहे.