कोरोनाबाधित सुमारे ८०० मृतदेहांवर अंतिम संस्कारासाठी सहाय्य
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 06:43 PM2020-07-17T18:43:05+5:302020-07-17T18:43:22+5:30
मृतदेह हाताळणी, रुग्णांना रुग्णालयात पोचवण्यासाठी विनामूल्य रुग्णवाहिका सेवा, सात जणांनी एकत्र येत सुरु केलेल्या कार्याला आता दोनशेहून अधिक तरुणांचे पाठबळ
खलील गिरकर
मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव काळात कोरोना बाधित रुग्णाला रुग्णालयात पोचवणे व निधन झाल्यावर त्याच्यावर अंत्यंसंस्कार करणे हे एक दिव्य ठरत आहे. अशा वेळी मुंबईतील सात जणांनी अशा प्रसंगी गरजूंना मदत करणे ही आपली नैतिक व माणुसकी म्हणून सामाजिक जबाबदारी असल्याचे समजले व त्या कामात झोकून दिले. सुरुवातीला अवघ्या सात जणांनी सुरु केलेल्या या कार्याला अधिकाधिक पाठबळ मिळत गेले व आता तब्बल दोनशेहून अधिक जण या कामात सहभागी झाले आहेत. या माध्यमातून आतापर्यंत सुमारे आठशे पेक्षा अधिक जणांवर अत्यंसंस्कार करण्यात आवश्यक ती मदत करण्यात आली काही ठिकाणी प्रत्यक्ष अंत्यसंस्कार करण्यात आले.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, ठाणे, जव्हार, मोखाडा यासह विविध भागात रुग्णांना मदत करण्यात आली. विशेष म्हणजे एकीकडे रुग्णवाहिकेसाठी मनमानी पध्दतीने भाडे आकारले जात असताना या गटाने ही सर्व सुविधा विनामूल्य पुरवली. महत्त्वाचे म्हणजे हे मदतकार्य करत असताना कोणत्याही रुग्णाचा, मृतदेहाचा धर्म किंवा जात आडवी आली नाही. सर्व जाती धर्माच्या नागरिकांना मदत करण्यात आली.
जामा मशीद ट्र्स्टचे अध्यक्ष शोएब खतीब, इक्बाल ममदानी, साबीर निर्बन, अँड इरफान शेख, सलीम पारेख, सोहेल शेख, रफिक सोराटिया या सात जणांनी या कार्याची मुहूर्तमेढ रोवली व आता मुंबई व परिसरातील दोनशेहून अधिक मुस्लिम तरुण या कार्यात सहभागी झाले आहेत.
सुरुवातीच्या टप्प्यात कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाल्यास मृतदेहाजवळ जाण्यास कुटुंबिय नकार देत होते. काही प्रकरणात घरातील एकाचा कोरोनाने मृत्यु व इतर कुटुंबिय कॉरन्टाईन असल्याने मृतदेहावर अंतिम संस्कार करु शकत नव्हते, काही प्रकरणात निधन झालेल्या व्यक्तीचे सर्व कुटुंबिय गावी असल्याने अंत्यसंस्काराबाबत समस्या उद्भवलेली असल्याचे समोर येत होते. याबाबत माहिती मिळाल्यावर या तरुणांनी मुस्लिम समाजातील अशा मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास प्रारंभ केला. मात्र कालांतराने ही समस्या सर्वच धर्माच्या नागरिकांना भेडसावत असल्याचे समोर आल्यावर या तरुणांनी आपले कार्य अधिक व्यापक करण्याचा निर्णय घेतला. या कामासाठी रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी सहा जुन्या रुग्णवाहिका दुरुस्त केल्या व वापरात आणल्या. रुग्णांना रुग्णालयात पोचवणे, मृतदेह कब्रस्तान, स्मशानात पोचवणे, मृतदेहावर अंत्यसंस्कार करणे अशी विविध कामे या गटाने करण्यास प्रारंभ केला.
हजारो जणांना रुग्णालयात पोचवण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात आली. याबाबत इक्बाल ममदानी म्हणाले, माणुसकी व सामाजिक कर्तव्य म्हणून आम्ही या कामाला प्रारंभ केला व टप्प्याटप्प्याने आम्हाला अधिक जणांचे पाठबळ मिळत गेले. सुरुवातीला अनेक प्रकरणात कुटुंबिय मृतदेहासोबत येण्यास टाळाटाळ करत होते त्यावेळी आम्ही अंत्यसंस्कार केले. मृत व्यक्ती हिंदू असताना आम्ही हिंदू पध्दतीने अंत्यसंस्कार केले. आमच्या टीम ने सुरक्षेसाठी पीपीई कीट हातमोजे, सँनिटायझर, मास्क यांचा आवश्यकतेनुसार वापर केला व सरकारी नियमांचे पालन करत ही मदत करण्याचा प्रयत्न केला असे ममदानी म्हणाले.