Hinganghat Case : हिंगणघाट पीडितेच्या कुटुंबीयांस मदत, उद्योजक आनंद महिंद्रांच भावनिक ट्विट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2020 05:48 PM2020-02-07T17:48:00+5:302020-02-07T17:56:10+5:30
Hinganghat Case : उद्योजक आनंद महिंद्रा यांनी ट्विट करुन पीडित कुटुंबाचा संपूर्ण खर्च करणार असल्याचं म्हटलं आहे
मुंबई - वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे एकतर्फी प्रेमातून एका माथेफिरूने प्राध्यापिकेवर पेट्रोल ओतून तिला जिवंत जाळले. या घटनेनं पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरला. घटनेनंतर महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते आणि महिला संघटना आक्रमक झाल्या आहेत. तर, पीडित कुटुंबांसाठी राज्यभरातून संवेदना व्यक्त करण्यात येत आहेत. मात्र, उद्योजक आनंद महिंद्रा यांनी पीडित कुटुंबीयांस मदतीचा हात देणारं ट्वि केलंय. आनंद महिंद्रांच्या या ट्विटवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत.
उद्योजक आनंद महिंद्रा यांनी ट्विट करुन पीडित कुटुंबाचा संपूर्ण खर्च करणार असल्याचं म्हटलं आहे. विचारांपलिकडची ही क्रुरता आहे, आयुष्य उध्वस्त करणारी घटना असून आपण ही बातमी वाचून पान उलटतो हे त्यापेक्षा अधिक क्रूर असल्याचं महिंद्रा यांनी म्हटलंय. जर कुणी पीडितेला किंवा तिच्या कुटुंबीयास ओळखत असेल तर मला कळवा. मी सर्वोतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करेन, असे महिंद्रा यांनी म्हटलंय. तसेच, मी केवळ पान उलटून गप्प राहणार नाही, असेही ते म्हणाले आहेत.
वर्धा जिल्ह्याचे खासदार रामदास तडस यांनी आज नागपुरातील ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये जाऊन पीडित तरुणीच्या तब्येतीची चौकशी केली आहे. हिंगणघाट घटनेचा निषेध करत, दिल्लीत अधिवेशन सुरू असताना त्यांनी या घटनेची माहिती सभागृहाला दिल्याचे ते म्हणाले. या घटनेची वार्ता ऐकून संपूर्ण सभागृह स्तब्ध झाले होते. गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनाही या संदर्भात माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले आहे. पीडित तरुणीला केंद्र सरकार कडून जास्तीत जास्त मदत कशी मिळेल यासाठी मी दिल्लीत तळ गाठून होते, अशी माहितीही त्यांनी दिली. आता हळू हळू पीडितेसाठी मदतीचा ओघ सुरू झाला असताना मी देखील माझे एक महिन्याचे मानधन पीडितेला देत असल्याचे रामदास तडस यांनी म्हटले.
Unimaginable cruelty. A life devastated.Even more cruel when we turn the page of the newspaper & move on. How is she managing her medical expenses? If anyone knows her/her family please let me know how I can help. I don’t just want to turn the page. https://t.co/KLUp2vGcYA
— anand mahindra (@anandmahindra) February 6, 2020
दरम्यान, भर रस्त्यात प्राध्यापिकेवर पेट्रोल ओतून तिला पेटवून देणारा आरोपी विक्की नगराळेने पीडितेला लग्नाची गळ घातली होती. परंतु उच्च शिक्षीत पीडितेचा नकार पचविणे नराधमाला कठीण गेल्याने त्याने हे अमानुष कृत्य केल्याचे पोलीस तपासातून पुढे आले आहे. याप्रकरणात पोलिसांनी प्रत्यक्षदर्शी 6 साक्षदारांचे जबाब नोंदविले आहेत. आरोपी विकेश नगराळे याने लग्नापूर्वी पीडितेला लग्नाची गळ घातली होती. त्याचा विवाह होऊन त्याला एक मुलगी झाली आहे. असे असतानाही तो वारंवार फोन करुन पीडितेला त्रास देत होता. 24 जानेवारी रोजी दोघांनी भेटण्याचे ठरविले. भेटल्यानंतर पीडितेने विकेशला वारंवार फोन का करतो, माझा पाठलाग का करतो, यानंतर मला फोन करायचा नाही, अशा शब्दात सुनावले होते. त्यामुळे अपमानित झालेल्या विकेशने पीडितेला संपविण्याचाच कट रचला.