मुंबई - वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे एकतर्फी प्रेमातून एका माथेफिरूने प्राध्यापिकेवर पेट्रोल ओतून तिला जिवंत जाळले. या घटनेनं पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरला. घटनेनंतर महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते आणि महिला संघटना आक्रमक झाल्या आहेत. तर, पीडित कुटुंबांसाठी राज्यभरातून संवेदना व्यक्त करण्यात येत आहेत. मात्र, उद्योजक आनंद महिंद्रा यांनी पीडित कुटुंबीयांस मदतीचा हात देणारं ट्वि केलंय. आनंद महिंद्रांच्या या ट्विटवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत.
उद्योजक आनंद महिंद्रा यांनी ट्विट करुन पीडित कुटुंबाचा संपूर्ण खर्च करणार असल्याचं म्हटलं आहे. विचारांपलिकडची ही क्रुरता आहे, आयुष्य उध्वस्त करणारी घटना असून आपण ही बातमी वाचून पान उलटतो हे त्यापेक्षा अधिक क्रूर असल्याचं महिंद्रा यांनी म्हटलंय. जर कुणी पीडितेला किंवा तिच्या कुटुंबीयास ओळखत असेल तर मला कळवा. मी सर्वोतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करेन, असे महिंद्रा यांनी म्हटलंय. तसेच, मी केवळ पान उलटून गप्प राहणार नाही, असेही ते म्हणाले आहेत.
वर्धा जिल्ह्याचे खासदार रामदास तडस यांनी आज नागपुरातील ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये जाऊन पीडित तरुणीच्या तब्येतीची चौकशी केली आहे. हिंगणघाट घटनेचा निषेध करत, दिल्लीत अधिवेशन सुरू असताना त्यांनी या घटनेची माहिती सभागृहाला दिल्याचे ते म्हणाले. या घटनेची वार्ता ऐकून संपूर्ण सभागृह स्तब्ध झाले होते. गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनाही या संदर्भात माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले आहे. पीडित तरुणीला केंद्र सरकार कडून जास्तीत जास्त मदत कशी मिळेल यासाठी मी दिल्लीत तळ गाठून होते, अशी माहितीही त्यांनी दिली. आता हळू हळू पीडितेसाठी मदतीचा ओघ सुरू झाला असताना मी देखील माझे एक महिन्याचे मानधन पीडितेला देत असल्याचे रामदास तडस यांनी म्हटले.