सहायक लेखाधिकारी एसीबीच्या जाळ्यात; ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी चार हजारांची लाच
By मनीषा म्हात्रे | Published: February 23, 2024 08:23 PM2024-02-23T20:23:09+5:302024-02-23T20:23:38+5:30
याप्रकरणी एसीबीने मिलींद पाखले या अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
मुंबई : प्रशासकिय कार्यालयातील ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागातील सहायक लेखाधिकारीने चार हजार रुपयांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) कारवाईत समोर आला आहे. याप्रकरणी एसीबीने मिलींद पाखले या अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सरकारी कर्मचारी आहेत. त्यांनी २००३ मध्ये या विभागाकडून एक लाख ८२ हजारांचे गृहकर्ज घेतले होते. त्यांनी या कर्जाची व्याजासह परतफेड केली. मात्र त्यानंतरही त्यांच्या वेतनातुन कर्जाचा हप्ता कपात झाला. तक्रारदार यांना संबधित प्रशासकिय कार्यालयातील ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता होती. मात्र एनओसी घेण्यासाठी तक्रारदार हे गेल्यावर्षी ५ जुलैला सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मुंबई कार्यालयात गेले होते. येथेमिलींद पाखले यांनी नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी सात हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.
तक्रारदार यांनी एसीबीकडे धाव घेत पाखलेविरोधात लेखी तक्रार दिली. त्यानुसार, एसीबीने केलेल्या पडताळणीत पाखले याने पाच हजार रुपयांची मागणी करून तडजोडी चार हजार रुपयांची लाच मागितली. अखेर, एसीबीने याप्रकरणाचा तपास करत गुरुवारी पाखले विरोधात गुरुवारी गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे.