सिटी मॉल आग प्रकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई सेंट्रल येथील सिटी मॉलमध्ये लागलेल्या भीषण आगीला दोन महिने उलटले तरी अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. या मॉलमधील दोनशे बेकायदा गाळे डी विभाग कार्यालयाने गेल्या आठवड्यात जमीनदोस्त केले. या बेकायदा बांधकामासाठी तत्कालीन सहायक आयुक्त जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी जोरदार मागणी सर्वपक्षीय सदस्यांनी स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी केली. याची गंभीर दखल घेत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी चौकशीचे निर्देश प्रशासनाला दिले.
सिटी मॉलमध्ये २२ ऑक्टोबर रोजी लागलेली आग ५६ तासांनंतर विझली होती. या मॉलमध्ये एक हजाराहून अधिक गाळे असून बेकायदा गाळ्यांचा आकडाही मोठा आहे. या आगीत इलेक्ट्रॉनिक व मोबाइल दुरुस्तीची शेकडो दुकाने जळून खाक झाली. या मॉलमध्ये सुरक्षेचे नियम धाब्यावर बसविण्यात आले होते. तरीही अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. मुंबईतील अशा अनेक मॉलमध्ये हीच परिस्थिती आहे. यामुळे मुंबईकरांची सुरक्षा वाऱ्यावर आहे, अशी नाराजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी व्यक्त केली.
विद्यमान सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी बेकायदा बांधकामांवर कारवाई केली. मात्र तत्कालीन सहायक आयुक्तांच्या आशीर्वादाने या मॉलमध्ये बेकायदा गाळे उभे राहिले होते. मॉलचा विकासक महापालिकेत दररोज हजेरी लावत असल्याचा आरोप आमदार व समाजवादीचे गटनेते रईस शेख यांनी केला. वरळी येथील अट्रीय मॉलमध्ये मोठ्या प्रमाणात अंतर्गत बदल करण्यात आले आहेत. या मॉलच्या चौकशीची मागणी झाली होती. मात्र अग्निशमन दलाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळाले नसताना महिनाभर मॉल का सुरू ठेवण्यात आला, असा सवाल स्थायी समिती अध्यक्षांनी उपस्थित केला.
* अहवाल सादर करण्याचे निर्देश
आतापर्यंत कनिष्ठ व दुय्यम अभियंता यांच्यावरच कारवाई झाली आहे. परंतु, सहायक आयुक्त पदावरील अधिकाऱ्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून स्थायी समितीला अहवाल सादर करण्याचे निर्देश अध्यक्षांनी या वेळी प्रशासनाला दिले.