स्वच्छतेसाठी सहायक आयुक्तांनी रस्त्यावर उतरावे ..! आयुक्तांच्या आढावा बैठकीत सूचना

By सीमा महांगडे | Published: February 8, 2024 08:40 PM2024-02-08T20:40:59+5:302024-02-08T20:41:07+5:30

सहायकआयुक्त कृती आराखडा तयार करून आठवड्यातून एकाच दिवशी मोहीम राबविणार

Assistant Commissioner should come down the road for cleanliness..! Notice in Commissioner's review meeting | स्वच्छतेसाठी सहायक आयुक्तांनी रस्त्यावर उतरावे ..! आयुक्तांच्या आढावा बैठकीत सूचना

स्वच्छतेसाठी सहायक आयुक्तांनी रस्त्यावर उतरावे ..! आयुक्तांच्या आढावा बैठकीत सूचना

मुंबई: मुंबई महानगरपालिकेकडून आतापर्यंत आठवड्यातील २ दिवस राबविण्यात येत असलेली स्वच्छता मोहीम यापुढे एकाच दिवशी लोकसहभागातून राबविण्यात येणार आहे. २४ प्रशासकीय विभागात (वॉर्ड) दर शनिवारी ही मोहीम राबवण्याच्या सूचना आयुक्त डॉ इकबाल सिंह चहल यांनी गुरुवारी घेतलेल्या आढावा बैठकीत दिल्या. प्रशासकीय विभागाच्‍या सहायक आयुक्‍तांनी दररोज सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत प्रत्यक्ष क्षेत्रावर उपस्थित रहावे असे ही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. या शिवाय सर्व विभागाच्या सहायक आयुक्तांनी आठवड्याच्‍या प्रत्‍येक सोमवारी सर्वसमावेशक बैठक घेऊन सूक्ष्‍म नियोजन करावे तसेच अतिरिक्‍त मनुष्‍यबळ, यंत्रणाच्‍या आधारे कृती आराखडा तयार करावा, स्‍थानिक लोकप्रतिनिधी, शालेय - महाविद्यालयीन विद्यार्थी, ख्‍यातनाम व्‍यक्‍ती, अशासकीय संस्‍था यांचा सहभाग वाढवावा अशा सूचनाही आयुक्तांनी दिल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनांनुसार सार्वजनिक स्‍वच्‍छतेसाठी पालिकेकडून संपूर्ण स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असून पालिकेकडून रस्‍ते, पदपथ, सार्वजनिक ठिकाणी धूळ हटवून पाण्याने धुण्‍याचे काम सुरू आहे. रस्‍त्‍यांवर साचलेली धूळ ब्रशने स्‍वच्‍छ करण्‍यात येत असून त्यानंतर रस्ते पाण्याने धुण्‍यात येत आहेत. नागरी परिसर स्‍वच्‍छ ठेवण्‍याची कार्यवाही ही सुरु आहे. यामुळे शहरातील सार्वजनिक स्‍वच्‍छता, नागरी आरोग्‍यामध्‍ये सकारात्‍मक बदल घडत असल्याचे मत चहल यांनी आढावा बैठकीत व्यक्त केले. या बैठकीला अतिरिक्त आयुक्तांसह, विविध सह आयुक्त, उप आयुक्‍त, सहायक आयुक्‍त आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

१००० किलोमीटर रस्त्ये धुण्याचे उद्दिष्ट्य

टँकरद्वारे रस्ते, पदपथ, चौक आदी एक दिवसाआड धुतले जात आहेत. त्‍यात वाढ होऊन दररोज १००० किलोमीटर रस्‍ते धुवण्‍याचे उद्दिष्‍टय साध्‍य झाले पाहिजे अशा सूचना आयुक्तांनी बैठकीत दिल्या. त्‍यासाठी मनुष्‍यबळ, टॅंकरच्‍या संख्‍येत वाढ करण्याचे स्पष्ट केले. प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) नुसार स्‍वच्‍छता कार्यवाही झाली पाहिजे. सहायक आयुक्तांनी कार्यक्षेत्रातील स्‍थळे, मनुष्‍यबळ, यंत्रणांचा कृती आराखडा तयार करावा आणि सामूहिक स्वच्छता मोहिमेत लोकसहभाग वाढविण्‍यासाठी विशेष प्रयत्‍न करावेत असे आयुक्तांनी आपल्या सूचनांमध्ये नमूद केले आहे. या निमित्ताने खासदार, आमदार, नगरसेवक या लोकप्रतिनिधींसह समाजातील ख्‍यातनाम व्‍यक्‍ती, उद्योजक, खेळाडू, ज्‍येष्‍ठ नागरिक, महाविद्यालयीन तरूण, शालेय विद्यार्थी, अशासकीय संस्‍था – संघटना आदींना सहभागी केले जावे. तसेच स्वच्छता मोहिमेदरम्यान वाहतूक विभाग, मलनिस्सारण विभाग, पर्जन्य जलवाहिन्या विभागासह सर्व विभागांच्‍या अधिकारी - अभियंत्‍यांनी स्‍वयंस्‍फूर्तीने सहभागी व्‍हावे, असे देखील त्‍यांनी सांगितले.

लोककलेचा वापर प्रचारासाठी करा

कचरा अलगीकरणासह सार्वजनिक प्रसाधनगृहांची स्‍वच्‍छता, सार्वजनिक उद्याने – स्थानिक उद्यानांची निगा राखणे, बेवारस वाहने हटवण्यासाठी वाहतूक पोलिसांची मदत घेणे याविषयीदेखील आयुक्‍त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी मार्गदर्शन केले. मुख्‍य रस्‍ते, महामार्ग यांबरोबरच झोपडपट्टी व तत्‍सम भाग, औद्योगिक क्षेत्र, उच्चभ्रू परिसर या विविध ठिकाणी व्‍यापक स्‍वरूपात स्‍वच्‍छता करावी. स्‍वच्‍छतेच्‍या प्रचार - प्रसारासाठी लोककलेचा वापर करावा, रस्‍तेदुभाजक, दगडी कडा यांची रंगरंगोटी करावी, असे निर्देशही आयुक्तांनी बैठकीत  दिले.

Web Title: Assistant Commissioner should come down the road for cleanliness..! Notice in Commissioner's review meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.