नवी मुंबई : सहायक पोलीस निरीक्षकाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी एपीएमसी पोलीस ठाण्यात घडली. यामध्ये ते गंभीर जखमी झाल्याने रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
भूषण पवार असे आत्महत्या केलेल्या सहायक निरीक्षकाचे नाव आहे. काही दिवसांपासून ते वैद्यकीय सुट्टीवर गेले होते. परंतु रविवारी सकाळी ते पोलीस ठाण्यात आले असता, १७ तारखेपासून कामावर रुजू होणार असल्याचे उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना सांगत होते. यानंतर ते अधिकाऱ्यांसाठी असलेल्या खोलीत गेले. त्यांनी दरवाजा आतून बंद केला. त्यानंतर काही वेळातच आतून गोळी सुटल्याचा आवाज आल्याने पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी दरवाजा उघडला असता आतमध्ये पवार हे रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आले. त्यांच्या छातीत गोळी लागलेली होती. यामुळे त्यांना तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले.
दुपारच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पवार हे शिस्तप्रिय व शांत अधिकारी म्हणून नागरिक व पोलिसांमध्ये परिचित होते. पवार यांना २००७ मध्ये शरीरसौष्ठव स्पर्धेत भारतश्री मिळालेला होता. तपास विभागात (डीबी) असताना त्यांनी अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल करून कामगिरी दाखवली होती. मात्र वर्षभरापूर्वी त्यांची तपास विभागातून जनरल विभागात बदली करण्यात आली होती. त्यानंतर काही महिन्यांपासून ते मानसिक तणावात होते. त्यांची पत्नी व दोन मुले पुण्याला राहायला असल्याने ते सुट्टीच्या दिवशीच पुणे येथील घरी जायचे. अन्यथा ड्यूटी संपल्यानंतरदेखील पोलीस ठाण्यातच झोपून रात्र काढायचे. मात्र काही दिवसांपूर्वी ते वैद्यकीय सुट्टीवर गेले होते. त्यानंतर रविवारी ते पोलीस ठाण्यात आले होते. स्वतःच्या शासकीय पिस्तूलमधून छातीत गोळी झाडून त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या तणावाचे व आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. उपायुक्तांकडून घेतल्या जाणाऱ्या बैठकीत कोणाला कौटुंबिक किंवा इतर समस्या आहेत का याबाबत विचारणा केल्या जातात. त्यातदेखील पवार यांनी कधी आपल्या समस्येची वाच्यता केली नसल्याचे समजते. यामुळे त्यांच्या आत्महत्येच्या कारणाचे गूढ कायम असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र या घटनेमुळे नवी मुंबई पोलीस दलात खळबळ उडाली आहे.