वीज कंपन्या; चक्रीवादळ रोधक यंत्रणा उभारण्यासाठी अभ्यास सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मान्सूनच्या तोंडावर चक्रीवादळ येणार हे गृहीत धरून तसेच चक्रीवादळात वीजपुरवठा खंडित होऊ नये म्हणून चक्रीवादळरोधक वीज पायाभूत सुविधा कशा उभारता येतील, याचा अभ्यास सुरू करण्यात आला आहे. चक्रीवादळाचा मुकाबला करण्यासाठी महावितरण, महापारेषण यांच्यासह मुंबईतील बेस्ट, अदानी, टाटा यांच्यासारख्या संस्थांचे प्रतिनिधी यांचा समावेश असलेला एक कोअर गट स्थापन करण्यात आला आहे. याशिवाय २४ तास सक्रिय असलेला एक नियंत्रण कक्षही महावितरणच्या मुख्यालयात स्थापन करण्यात आला आहे.
जागतिक वातावरणात होणारे बदल लक्षात घेता दरवर्षी मान्सूनच्या तोंडावर चक्रीवादळ येणार, हे गृहीत धरून नियोजन करा. वादळामुळे कमी नुकसान होईल. वीजपुरवठा तत्काळ पूर्ववत करता येईल, यासाठी कायमस्वरूपी नियोजन, आदर्श कार्यप्रणाली (एसओपी) तयार करा, असे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, दरवर्षी पाऊस आल्यावर अनेक ठिकाणी वीज जाते. हे टाळण्यासाठी पावसाळी पूर्वतयारीचा भाग म्हणून पाऊस झाल्यावरही वीजपुरवठा कायम राहावा, यासाठी आपत्कालीन योजना तयार करा. एखाद्या ठिकाणी वीज गेल्यास तिथे वीजपुरवठा करण्याचे अन्य पर्याय काय असतील, याचाही आराखडा तयार करा, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत.
.................................