‘आश्वासनपूर्तीची तपासणी भाजपापासून करावी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 04:56 AM2018-08-09T04:56:49+5:302018-08-09T04:57:02+5:30
लोकांना आश्वासन द्यायचे आणि निवडणुकीनंतर ते कसे विसरायचे हे भाजपाने शिकवले आहे.
मुंबई : लोकांना आश्वासन द्यायचे आणि निवडणुकीनंतर ते कसे विसरायचे हे भाजपाने शिकवले आहे. कल्याण-डोंबिवलीकरांना मुख्यमंत्र्यांनी साडेसहा हजार कोटी पॅकेजचे देण्याचे आश्वासन अद्याप पूर्ण केलेले नाही. त्यामुळे राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी कल्याण-डोंबिवलीपासून त्यांच्या निर्णयाची सुरुवात करावी, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला.
निवडणूक न लढविणाऱ्या आणि आश्वासनांची पूर्तता अहवाल सादर न करणाºया राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त सहारिया यांनी दिली. पाटील यांनी निर्णयाचे स्वागत केले. परंतु अंमलबजावणी करताना सुरुवात कल्याण-डोंबिवलीकरांना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनापासून करावी असे सांगितले. राज्यात आजवर झालेल्या निवडणुकांमधील आश्वासने कुठल्या पक्षांनी पूर्ण केली आहेत यासाठी सहारिया यांनी पक्षांचे जाहीरनामे मागवून ते तपासावेत. पक्ष प्रमुखांची कमिटमेंट घेवून मग ते प्रसिद्ध करावेत. त्यातील ७० टक्के मुद्दे पूर्ण केले नाहीत तर त्या पक्षाला किंवा गटाला पुढच्या निवडणुकीमध्ये उभे राहण्यास मज्जाव करावा असा क्रांतिकारक निर्णय सहारिया घेणार असतील तर त्यांचे स्वागत आहे असेही पाटील म्हणाले.