Join us

राज्यसभेचे आश्वासन मिळाल्याने आठवलेंची लोकसभेतून माघार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 4:55 AM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभेचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्याचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी स्पष्ट केले.

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभेचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्याचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी स्पष्ट केले. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार राहुल शेवाळे यांनी आठवले यांची भेट घेतली. या भेटीनंतर आठवले माध्यमांशी बोलत होते.रामदास आठवले यांनी दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघावर दावा केला होता. शिवसेनेने आठवले यांची मागणी फेटाळून लावत विद्यमान खासदार राहुल शेवाळेच उमेदवार असतील, असे स्पष्ट केले होते. यानंतर आरपीआय कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर शेवाळे यांनी रविवारी वांद्रे येथे आठवले यांची भेट घेतली. संविधान बंगल्यावर सुमारे तासभर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. यानंतर माध्यमांशी बोलताना आठवले म्हणाले की, शनिवारी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. त्यांनी मला राज्यसभेचे आश्वासन दिले आहे. दक्षिण मध्य मुंबईतून मी याआधी निवडून आलो होतो. त्यामुळे इथे मला संधी मिळावी, अशी इच्छा होती. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर मित्रपक्षांशी याबाबत बोलणेदेखील झाले होते. आता मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर हा विषय संपला असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले. राहुल शेवाळे माझे चांगले मित्र आहेत. युतीचा धर्म पाळत मी आणि माझे कार्यकर्ते शेवाळेंच्या प्रचारात सहभागी होणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.‘आठवलेंचाविरोध नव्हताच’आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले यांचा माझ्या उमेदवारीला विरोध नव्हता. पक्ष वाढविण्यासाठी आणि निवडणूक आयोगाच्या काही अटींची पूर्तता करण्यासाठी त्यांना निवडणूक लढवायची होती. केवळ दक्षिण-मध्य मुंबईतच नव्हे तर सर्वच जागांवर महायुतीचा धर्म पाळणार असल्याचा शब्द आठवले यांनी दिल्याचे राहुल शेवाळे यांनी सांगितले. .

टॅग्स :रामदास आठवलेलोकसभा निवडणूक