Join us  

ससून डॉक बंदरातील समस्या दूर करण्याचे आश्वासन

By admin | Published: June 19, 2014 12:12 AM

राज्यातील मच्छिमारांसाठी ससून डॉक बंदर एकमेव बंदर आहे. मुंबई, ठाणे, रायगड आदि जिल्ह्यातील हजारो मच्छीमार बोटी ससुनडॉक बंदरात लागतात

उरण : ससून बंदरात मच्छीमारांना जाणवणाऱ्या विविध समस्या दूर करण्याच्या मागणीसाठी बुधवारी भाजपा प्रदेश कमिटी सदस्य महेश बालदी आणि राज्यातील विविध मच्छीमार संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीत झालेल्या विविध समस्यांवरील चर्चेनंतर ससून बंदरातील वाढत्या गाळाची आणि बोटी बांधण्यासाठी बोलार्ड उभारणे अशा या महत्त्वाच्या समस्या दूर करण्याचे काम येत्या आठवडाभरात निविदा काढून सुरु करण्याचे आश्वासन मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष रवी परमान यांनी मच्छिमारांना दिले.राज्यातील मच्छिमारांसाठी ससून डॉक बंदर एकमेव बंदर आहे. मुंबई, ठाणे, रायगड आदि जिल्ह्यातील हजारो मच्छीमार बोटी ससुनडॉक बंदरात लागतात. या बंदराची क्षमता सुमारे ७५० मच्छीमार बोटींची आहे. मात्र बंदरात क्षमतेपेक्षा दुप्पट बोटी बंदराच्या आश्रयाला येत असल्याने मच्छीमार बोटींसाठी ससून डॉक बंदर अपुरे पडत आहे. त्या शिवाय बंदरातील गाळ अनेक वर्षापासून काढला गेला नाही. परिणामी ससून डॉक बंदरात मच्छीमार बोटी लॅण्डिंग करणे कठीण होऊ लागले आहे. तसेच बंदरात आलेल्या बोटी बांधण्यासाठी आवश्यक असलेले लोखंडी बोलार्ड गंजून नामशेष झाले आहेत. किंबहुना उरलेल्या बोलार्डची संख्या अत्यंत कमी आहे. त्यामुळे मच्छिमारांना ट्रॉलर्स बंदरात बांधून ठेवणे अशक्य होऊ लागले आहे. या व्यतिरिक्त मच्छीमारांना बंदरातील अनेक असुविधांचा सामना करावा लागत असल्याने मच्छिमारांमध्ये तीव्र असंतोष आहे.ससून डॉक बंदरातील मच्छिमारांना भेडसाविणाऱ्या समस्या दूर करण्याच्या मागणीसाठी बुधवारी (१८) भाजपा प्रदेश कमिटी सदस्य महेश बालदी, करंजा मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष प्रदीप नाखवा, जयवीन कोळी, राजेश कोळी, अमर नाखवा, नारायण नाखवा, प्रितम कोळी आणि राज्यातील विविध मच्छीमार संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष रवी परमार, मुख्य अभियंता एरंडेकर, बंदर वाहतूक व्यवस्थापक दामोदर नायक, हारबर मास्टर विजय परेरा आदी अधिकारी उपस्थित होते. ससून डॉक बंदरातील अनेक वर्षांपासून भेडसाविणाऱ्या विविध समस्यांमुळे राज्यातील मच्छीमार व्यवसाय अडचणीत आला आहे. ससून बंदरातील वाढत्या गाळाची समस्या येत्या महिन्याभरात निविदा काढून दूर करण्याचे तर, बोटी बांधण्यासाठी बोलार्ड बांधण्याचे काम येत्या आठवडाभरात निविदा काढून सुरु करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. (वार्ताहर)