लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भविष्य सांगतो, म्हणून एका ज्योतिषाला घरात घेणे विवाहितेला भलतेच महागात पडले आहे. पुढे पती सोडून जाईल, अशी भीती घालून महिलेचे नग्न फोटो, व्हिडीओ काढले. पुढे हेच फोटो व्हायरल करण्याची धमकी देत, तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार दादरमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी दादर पोलिसांनी ज्ञानेश्वर कोरगावकर नावाच्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
दादर परिसरात ४० वर्षीय तक्रारदार महिला राहण्यास आहे. त्या मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करतात. गेल्या वर्षी सप्टेबर महिन्यात कोरगावकर हा त्यांना भविष्य सांगतो म्हणत घरात आला. पुढे त्यांच्या मुखातून गुरू बोलत आहे. त्यांचे न ऐकल्यास पती सोडून जाईल, मुले आजारी पडतील, व्यवसाय ठप्प होईल, पुढे प्रकरण पोलिसांपर्यंत जाण्याची भीती घातली. महिला त्यांच्या जाळ्यात अडकताच तिला मारहाण करत त्यांचे नग्न फोटो आणि व्हिडीओ काढले. पुढे हेच फोटो व्हायरल करण्याची धमकी देत, त्यांच्यावर ऑक्टोबर, २०२० पर्यंत बलात्कार करत होता. कोरगावकरचे अत्याचार वाढत असल्याने महिलेने पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार, दादर पोलिसांनी १७ तारखेला या प्रकरणी गुन्हा नोंद करत अधिक तपास सुरू केला आहे.