मुंबई : या शतकातील मोठे चंद्रग्रहण शुक्रवारी खगोलप्रेमींना पाहता आले. ११.५४ वाजता सुरु झालेले खग्रास चंद्रग्रहण मध्यरात्री २.४३ वाजता समाप्त झाले. जवळपास ३ तास या चंद्राची खग्रास अवस्था दिसून आली. ढगाळ वातावरणामुळे मुंबईत चंद्रग्रहण दिसू शकले नाही. मात्र पुणे, नांदेड, औरंगाबाद, नागपूर, सोलापूर येथील काही भागातून या ग्रहणाचे निरीक्षण करता आले. काही ठिकाणी साध्या डोळ्यांनी व दुर्बिणीतूनही ग्रहण पाहण्याचा आनंद खगोलप्रेमींनी घेतला. पुढच्या वर्षीही गुरुपौर्णिमेच्या दिवशी १६ जुलै २०१९ रोजी खंडग्रास चंद्रग्रहण होणार असून, संपूर्ण देशातून दिसणार असल्याचे खगोलअभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. सोशल मीडियावर ‘#ब्लड मून’ हॅशटॅग वापरून खग्रास चंद्रग्रहणांचे फोटो व्हायरल होत होते.पृथ्वीच्या सावलीतून चंद्र पूर्णपणे जात असल्याने या ग्रहणाला खग्रास चंद्रग्रहण म्हटले जाते. या काळात चंद्र हा पृथ्वीपासून दूर जात असून त्याचा वेग नेहमीपेक्षा मंदावतो. त्यामुळे यंदाचे ग्रहण हे या शतकातील मोठे ग्रहण होते. यानंतर पुन्हा ९ जून २१२३ मध्ये असे ग्रहण अनुभवयास मिळेल. जुलै महिन्यात सूर्य हा पृथ्वीपासून दूर अंतरावर असतो. त्यामुळे पृथ्वीची लांबलचक सावली पडत असते. या ग्रहणादरम्यान चंद्र या सावलीतून जात असल्याने हे ग्रहण पाहायला मिळते. चंद्र पृथ्वीपासून लांब गेल्याने त्याचा छोटा आकार, त्याचा मंदावलेला वेग आणि पृथ्वीची मोठी सावली या तीन प्रमुख कारणांमुळे हे ग्रहण निर्माण होते. शुक्रवारी मध्यरात्री झालेले खग्रास चंद्रग्रहण हे ‘सारोस’ चक्रातील १२९ वे ग्रहण आहे. या आधीचे सर्वांत मोठ्या कालावधीचे खग्रास चंद्रग्रहण १६ जुलै २००० या दिवशी झाले होते. योगायोग म्हणजे दोन्हीही ग्रहण एकाच सारोस चक्रातील आहेत. पृथ्वीच्या पूर्व गोलार्धातील जवळपास सर्वच खंडांतून हे ग्रहण पाहायला मिळाले.
खगोलप्रेमींनी लुटला खग्रास चंद्रग्रहणाचा आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 4:08 AM