खगोलप्रेमींना आज ‘मंगळ’ पाहण्याची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 03:41 AM2018-07-31T03:41:16+5:302018-07-31T03:42:10+5:30
मंगळ ग्रह पृथ्वीच्या जवळ; म्हणजे ५ कोटी ७५ लाख किमी अंतरावर येणार असल्याने खगोलप्रेमींना आज मंगळ ग्रह निरीक्षणाची संधी मिळणार असल्याचे खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले.
मुंबई : मंगळ ग्रह पृथ्वीच्या जवळ; म्हणजे ५ कोटी ७५ लाख किमी अंतरावर येणार असल्याने खगोलप्रेमींना आज मंगळ ग्रह निरीक्षणाची संधी मिळणार असल्याचे खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. मंगळ जेव्हा पृथ्वीपासून दूर जातो, त्या वेळी तो पृथ्वीपासून ४० कोटी १० लक्ष किमी अंतरावर असतो. रात्रीच्या प्रारंभी पूर्व आकाशात उत्तराषाढा नक्षत्रात मंगळ ग्रहाचे दर्शन होईल. तो लालसर रंगाचा दिसत असल्याने सहज ओळखता येईल.
पंधरा वर्षांपूर्वी २७ आॅगस्ट २००३ रोजी मंगळ ग्रह पृथ्वीच्या जवळ ५ कोटी ५७ लाख किमी अंतरावर आला होता. आज दिसणारा मंगळ यानंतर पुन्हा १७ वर्षांनी; म्हणजे ११ सप्टेंबर २०३५ रोजी पृथ्वीच्या जवळ ५ कोटी ६९ लाख किमी अंतरावर येणार आहे, असे सोमण यांनी सांगितले.
नेहरू तारांगणचे संचालक अरविंद परांजपे यांनी सांगितले, पृथ्वी आणि मंगळ हे ग्रह १५ ते १७ वर्षांनी जवळ येतात. मंगळ आणि पृथ्वी यांच्यातील जास्तीतजास्त अंतर १०० दशलक्ष किमी ते कमीतकमी अंतर ५६ दशलक्ष किमीदरम्यान असते.