लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या प्रांगणात सोमवारी सायंकाळी सूर्यास्तानंतर गुरू-शनि युती दर्शनाचा विशेष उपक्रम स्मारक व खगोल मंडळातील अभ्यासकांच्या वतीने आयोजित केला होता. यावेळी सुमारे ६० लोक उपस्थित होते. स्मारकाच्या विविध उपक्रमांतील विद्यार्थ्यांनीही त्याचा लाभ घेऊन या खगोलीय पर्वणीचा आनंद घेतला. खगोल अभ्यासकांनी गुरू व शनि या ग्रहांच्या युतीचे दर्शन लोकांना अधिक चांगले घडवून देण्यासाठी माहिती दिली. विशेष दुर्बिणीही आणून उपस्थित लोकांना या दर्शनाचा आनंद दिला.
सोमवारी सूर्यास्तानंतर हे दोन्ही ग्रह जवळ येत असल्याचे लोकांनी अनुभवले. सायंकाळी सूर्यास्तानंतर संधी प्रकाशानंतर हे ग्रह साध्या डोळ्यांनाही दिसत होते. मात्र, त्या ग्रहांचे अधिक जवळून दर्शन व त्यांची ती स्थिती ही दुर्बिणीच्या साहाय्याने पाहता येत होती. स्मारकामध्ये झालेल्या गुरू- शनि ग्रह युती दर्शनाच्या कार्यक्रमात लोकांनी सहभाग नोंदवत कोरोनासंबंधातील नियमांचेही पालन केले. खगोल मंडळाच्या अभ्यासकांनी युती म्हणजे काय, आताची युती कशी व किती वर्षांनी येत आहे, विविध संलग्न माहिती देत, खगोलीय घटनांचे औत्सुक्य लोकांमध्ये निर्माण केले. कार्यवाह राजेंद्र वराडकर यांच्यासह कर्मचारीही उपस्थित होते.
१२२६ साली त्यानंतर १६२३ व नंतर आता हे ग्रह सर्वात जवळ आले होते. सुमारे ३९७ वर्षांनी गुरू व शनि ग्रहांची युती सौर मंडळात खगोलप्रेमींना पाहावयास मिळाली. यापूर्वी हे ग्रह गॅलिलिओच्या काळामध्ये म्हणजे १७व्या शतकात जवळ आले. आता हे ग्रह पुन्हा परस्परांपासून दुरावण्यास सुरुवात होईल. २०८० साली अशीच एक युती या दोन ग्रहांमध्ये होईल.
........................................