लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी देशातील अनेक राज्यांत शाळा आणि शैक्षणिक संस्था अद्याप बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑनलाईन शिक्षणाचा विद्यार्थ्यांना बसलेला सगळ्यात मोठा फटका म्हणजे होत असलेले शैक्षणिक नुकसान आहेच, याशिवाय त्यांच्या मित्रांशी प्रत्यक्ष भेटण्यावर आलेल्या मर्यादा हा आहे. देशपातळीवर करण्यात आलेल्या २००० विद्यार्थ्यांच्या एका सर्वेक्षणानुसार तब्बल ८१ टक्के विद्यार्थ्यांनी आपण आपल्या मित्रांशी प्रत्यक्ष संवाद साधू शकत नसल्याची खंत व्यक्त केली आहे.
ब्रेनली ही ऑनलाईन सर्वेक्षण करणारी संस्था असून, कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक विषयांवर या संस्थेचे सर्वेक्षण सुरू असते. अशाच एका सर्वेक्षणात शाळांमध्ये केवळ विद्यार्थी शिक्षण घेत नाहीत तर वर्गमित्रांसोबत, शिक्षणासोबत असलेल्या संवादातून सामाजिक कौशल्येही आत्मसात करत असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. प्रत्यक्ष शाळांमध्ये असताना विद्यार्थी तेवढा वेळ विविध उपक्रम, खेळणी शिक्षणातून आयुष्याची कौशल्ये आत्मसात करत असतात. दरम्यान, घरी असताना मोकळ्या वेळेचा वापर ४४ टक्के विद्यार्थी नवीन उपक्रम शिकण्यासाठी करतात. ३२ टक्के विद्यार्थी टीव्ही पाहण्यासाठी, ३० टक्के व्हिडिओ गेम खेळण्यासाठी, तर १८ टक्के विद्यार्थी इंटरनेट सर्फिंग करण्यासाठी वेळ वापरत असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.
या सर्वेक्षणादरम्यान घरी राहून ऑनलाईन शिक्षणात तणाव येतो का, या प्रश्नावर ४५ टक्के विद्यार्थ्यांनी होकारार्थी उत्तर दिले. मात्र, हा तणाव दूर करण्यासाठी शाळेतून विविध उपक्रम शिकविले जातात, असेही उत्तर त्यांनी दिले आहे. ६८ टक्के विद्यार्थ्यांनी आपल्याला शाळेतून विविध प्रकारचे शारीरिक शिक्षणाचे उपक्रम शिकविले जात असल्याची माहिती दिली. घरी राहून ऑनलाईन पद्धतीने अभ्यास करता येतो आणि सुरक्षित राहता येते, यावर ४६ टक्के विद्यार्थ्यांनी समाधानही व्यक्त केले आहे. याचे एक कारण म्हणजे प्रत्यक्षरित्या विद्यार्थ्यांचा आपल्या समन्वयकांशी होत असलेला संवाद असू शकतो, असेही कारण सर्वेक्षणातून पुढे आले आहे.
कोट
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात वर्गमित्रांशी सौहार्दपूर्ण संवाद हा खूप महत्त्वाचा भाग असतो. विद्यार्थ्यांनी घरी राहून तणावपूर्ण अभ्यासाशी जुळवून घेतले असले तरीही ते प्रत्यक्ष वर्गात जाण्यास उत्सुक आहेत. यावरून तंत्रज्ञान हे मित्रांसोबतच्या संवादाची जागा घेऊ शकत नाही, हे स्पष्ट होते. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला तरी ऑनलाईन शिक्षणाचा वापर शालेय शिक्षणात कायम राहण्याची शक्यता राहणार आहे.
राजेश बिसानी, मुख्य उत्पादन अधिकारी, ब्रेनली