दादर रेल्वे स्थानकात मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या फ्लॅटफॉर्म क्रमांकावरुन होणारा गोंधळ लक्षात घेता रेल्वे प्रशासनानं नवा निर्णय घेतला आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या प्लॅटफॉर्मचे क्रमांक आता सलग एका ओळीत म्हणजेच पश्चिम रेल्वेचे फ्लॅटफॉर्म १ ते ७ आणि मध्य रेल्वेच्या फ्लॅटफॉर्मचा क्रमांक ८ ते १५ असे केले जाणार आहेत.
सध्या पश्चिम रेल्वेवर १ ते ७ क्रमांकाचे प्लॅटफॉर्म आहेत. तसेच मध्य रेल्वेवरही प्लॅटफॉर्मचे क्रमांक १ पासून सुरू होतात. मग एकाच क्रमांकाचे प्लॅटफॉर्म असल्यानं प्रवाशांचा हा प्लॅटफॉर्म नेमका कोणता? मध्य रेल्वेचा की पश्चिम रेल्वेचा? असा गोंधळ उडायचा. आता मध्य रेल्वेवरील सध्याच्या १ क्रमांकाच्या प्लॅटफॉर्म ८ क्रमांक दिला जाईल. त्यानुसार पुढे १५ क्रमांकापर्यंतचे मध्य रेल्वेचे प्लॅटफॉर्म असतील.
दादर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मचे क्रमांक बदलण्यासाठीची मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत प्लॅटफॉर्म क्रमांक बदलण्याबाबतचा निर्णय झाला. यानुसार रेल्वे प्रशासनानं प्लॅटफॉर्म क्रमांक बदलण्यासाठीची तयारी सुरू केलीय. बैठकीत पश्चिम रेल्वेपासून एक क्रमांक ते मध्य रेल्वेच्या शेवटच्या फलाटापर्यंत अर्थात दादर टर्मिनसच्या फलाटापर्यंत अनुक्रमानुसार रांगेमध्ये क्रमांक देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पश्चिम रेल्वेवरील फलाटांचे क्रमांक बदलणार नाहीत. मात्र, मध्य रेल्वेवरील फलाट क्रमांक बदलण्यात येतील.