Join us  

इथे रोज होतात किमान ५० रुग्णांचे मृत्यू...; मुंबईतील सार्वजनिक रुग्णालयांतील धक्कादायक वास्तव

By संतोष आंधळे | Published: August 19, 2023 9:53 AM

कोणत्याही आपत्तीत रुग्ण हे प्रथम अशा सार्वजनिक रुग्णालयातच दाखल केले जात असतात.

संतोष आंधळे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :मुंबईतील पाच प्रमुख सार्वजनिक अशा सरकारी व पालिका रुग्णालयांत दरदिवशी सरासरी ५० रुग्णांचा मृत्यू होत असल्याचे दिसून आले आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते या ठिकाणी अनेक रुग्ण हे अत्यवस्थ अवस्थेत दाखल होत असतात, तसेच कोणत्याही आपत्तीत रुग्ण हे प्रथम अशा सार्वजनिक रुग्णालयातच दाखल केले जात असतात.

मुंबईत जेजे, केईएम, सायन, नायर, कूपर या प्रमुख पाच सार्वजनिक रुग्णालयांमध्ये राज्याच्या विविध भागांतील रुग्णांना उपचारासाठी दाखल केले जाते. आजही इतर रुग्णालयांमध्ये दाखल झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून या रुग्णालयात व्हेंटिलटर आहे का, अशी विचारणा कायम होत असते. परंतु, या सार्वजनिक रुग्णालयांमध्ये ‘आयसीयू’ चे बेड्स कायम फुल्ल असतात. व्हेंटिलेटर मिळण्यासाठी या ठिकाणी रुग्ण कायम प्रतीक्षा यादीवर असतात.

अशी स्थिती आणि अशी कारणे...

- सार्वजनिक रुग्णालयांमध्ये अनेक दिवस खासगी रुग्णालयात उपचार घेताना अत्यवस्थ झालेल्या रुग्णाला पैशांच्या चणचणीमुळे हलवले जाते.

- काहीवेळा तेथील व्हेंटिलेटरवरील रुग्णाच्या नातेवाईकांकडील पैसे संपलेले असतात. तर  काही खासगी रुग्णालयांत रुग्ण वाचण्याची शक्यता नसल्याचे सांगितल्यानंतर घरी नेऊन आपल्याला काही करता येणार नाही म्हणून त्याला सार्वजनिक रुग्णालयात आणले जाते.

- या सार्वजनिक रुग्णालयांत येणाऱ्या प्रत्येक रुग्णावर उपचार केले जातात. कारण या रुग्णालयाला कोणत्याही रुग्णाला उपचार नाकारायचा अधिकार नाही. त्यामुळे जे कुणी ज्या परिस्थितीत येतील त्यांना या रुग्णालयात दाखल करून उपचार दिले जातात. अनेक रुग्ण नियमित उपचार करून बरे होऊन घरीही जातात.

रुग्णालय    बेड्स संख्या    ओपीडी    दाखल रुग्णसंख्या    मृत्यू जेजे रुग्णालय    १३५२    २२०० ते २५००    १२५० ते १३००    ७केईएम रुग्णालय     २२५०    ६००० ते ६५००    १७०० ते १८००    १५सायन रुग्णालय    १९००    ६०००     १५००     १५नायर रुग्णालय     १६३२     १२०० ते १२५०    १७०० ते १८००    ८कूपर रुग्णालय    ७००     १५०० ते १६००     ४५० ते ५००    ६

सार्वजनिक रुग्णालयावर अतिरिक्त ताण, तरीही गरिबांचे आशास्थान

सार्वजनिक रुग्णालयात अनेकदा अत्यवस्थ रुग्ण आणला जातो,  खासगीमध्ये पैसे नसल्याने उपचार होत नाहीत आणि मग रुग्णाचे नातेवाईक त्याला या ठिकाणी दाखल करतात. तसेच डॉक्टर व रुग्ण यांचे या रुग्णालयात प्रमाण व्यस्त आहे. या सर्व रुग्णालयांवर अतिरिक्त ताण  आहे. या परिस्थितीतही मोठ्या शस्त्रक्रियांमुळे रुग्ण सुखरूप घरी जातात हे वास्तव नाकारता येणार नाही. मोठ्या प्रमाणात गरीब रुग्णांसाठी ही रुग्णालये आशेचे स्थान आहे. रुग्ण मोठ्या संख्येने दगावत असेल तर त्याचे डेथ ऑडिट करून कारणे शोधणे सहज शक्य आहे. या रुग्णालयातील डॉक्टरांची रिकामी पदे प्रशासकीय कारणामुळे भरली जात नाही. काही असले तरी कुठल्याही पद्धतीचे राजकारण होता कामा नये. - डॉ. संजय ओक, माजी संचालक मुंबई महापालिका वैद्यकीय महाविद्यालये

 

टॅग्स :मुंबईहॉस्पिटल