मंत्रिमंडळ विस्तार लांबल्याने खदखद; आमदार बसलेत देव पाण्यात ठेवून, बच्चू कडूंची उद्विग्नता
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 06:36 AM2023-01-11T06:36:31+5:302023-01-11T06:36:38+5:30
नुकतेच शिंदे गटाकडून मंत्रिपद हुकलेले आमदार संजय शिरसाट यांनी २० ते २२ जानेवारीला मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी तारीख जाहीर केली.
मुंबई : मंत्रिपद कधी मिळणार, याकडे अनेक आमदार सहा महिन्यांपासून डोळे लावून बसले असले तरी सध्या तरी मंत्रिमंडळ विस्ताराची कोणतीही शक्यता नसल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
नुकतेच शिंदे गटाकडून मंत्रिपद हुकलेले आमदार संजय शिरसाट यांनी २० ते २२ जानेवारीला मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी तारीख जाहीर केली. मंत्रिमंडळ विस्तारात काही तांत्रिक अडचणी आहेत त्या १५ जानेवारीपर्यंत संपतील, असे त्यांनी सांगितले होते.
भाजप आमदारांमध्ये मात्र या विषयावर मौनच आहे. सरकार व्यवस्थित चालले असून २०२४ अखेरपर्यंत ते व्यवस्थित चालेल, असेच त्यांच्याकडून सांगितले जात आहे.
शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर पहिले ४० दिवस मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडूनच सरकार चालविण्यात आले. त्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारातही दोन्हीकडील नऊ-नऊ आमदारांनाच संधी मिळाली आहे. आपल्याला संधी मिळेल, या आशेवर अनेक आमदार देव पाण्यात ठेऊन बसले आहेत.
बच्चू कडूंची उद्विग्नता
मंत्रिपद मिळत नसल्याने बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे. दिव्यांग मंत्रालयाचे मंत्रिपद तुमच्याकडे कधी येणार, असा प्रश्न कडू यांना विचारण्यात आला. त्यांनी हा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच विचारा, असे उत्तर दिले.
नाराजांचे ऑपरेशन गुवाहाटी टीमकडे
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत कोणतीही ठोस तारीख जाहीर होत नसल्याने अनेक आमदार अस्वस्थ आहेत. त्यांना सांभाळण्याची जबाबदारी सूरत ते गुवाहाटी टूरमध्ये शिंदे गटातील आमदारांची संख्या वाढविण्याची जबाबदारी ज्या टीमकडे होती त्याच टीमकडे सोपविण्यात आली आहे.
तारीख पे तारीख
ठाकरे-शिंदे गटातील वादावर सर्वोच्च न्यायालयात ‘तारीख पे तारीख’ पडत आहे. त्याप्रमाणेच विस्ताराच्याही नवनवीन तारखा इच्छुकांकडून जाहीर केल्या जात आहेत.