…तेव्हा बाळासाहेबांना विरोध करणारे भाजपा नेतेच होते; ‘द काश्मीर फाइल्स’वरून संजय राऊतांनी करून दिली आठवण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 12:32 PM2022-03-17T12:32:44+5:302022-03-17T12:36:50+5:30
तो चित्रपट जर कोणाचा पोलिटिकल अजेंडा बनत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे असा टोला राऊतांनी भाजपाला लगावला
मुंबई – ‘द काश्मीर फाइल्स’ सिनेमावरून शिवसेना-भाजपा आमनेसामने आल्याचं पाहायला मिळत आहे. काश्मीरात झालेल्या पंडितांवर अत्याचाराचं चित्रण या सिनेमातून पुढे आणलं आहे. देशात बहुतांश भाजपा शासित राज्यात द काश्मीर फाइल्स(The Kashmir Files) या सिनेमाला टॅक्स फ्री केले आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्रातही या सिनेमाला टॅक्स फ्री करावं अशी मागणी भाजपा आमदारांनी केली. मात्र महाविकास आघाडी सरकारने त्यास नकार दिला. आता या मुद्द्यावरून भाजपा(BJP) शिवसेनेला कोंडीत पकडण्याची चिन्हे आहेत.
शिवसेना खासदार संजय राऊत(Shivsena Sanjay Raut) म्हणाले की, भाजपाला आता काश्मीर दिसतंय, काश्मीर फाईल्स सिनेमा आल्यावर त्यांना काश्मीर आठवलं, ३२ वर्षे कुठे होते हे लोक, हा फार संवेदनशील विषय आहे. पाकव्याप्त काश्मीर भारतात आणून अखंड हिंदुस्थान निर्माण करू असे मोदींनी सांगितले होते. त्यासाठी लोकांनी मोदींना यासाठी मतं दिलेली आहे. त्याची आम्ही अजूनही वाट बघत आहोत. तो चित्रपट जर कोणाचा पोलिटिकल अजेंडा बनत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे असा टोला त्यांनी भाजपाला लगावला.
तसेच बाळासाहेब ठाकरे हे एकमेव असे नेते होते की काश्मिरी पंडितांना हातात शस्त्र द्या, ते आपलं रक्षण करतील, तेव्हा त्यांना अशाप्रकारे वक्तव्य केले म्हणून विरोध करणारे केंद्रातील भाजप नेते होते. अमरनाथ यात्रा उधळून देण्याची धमकी देणाऱ्या लोकांना सांगितलं की तुमची हजला जाणारी विमान मी उडू देणार नाही, त्यानंतर अमरनाथ यात्रा सुरळीत पार पडली, वैष्णव देवी यात्रा पार पडली, काश्मिरी पंडितांच्या मुलांसाठी ५ टक्के राखीव जागा इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांना देणारे बाळासाहेब ठाकरे होते अशी आठवणही शिवसेना नेते संजय राऊतांनी भाजपाला करून दिली.
इतकं टोकाचं राजकारण कुणी केले नाही
कोणत्या विषयाचे राजकारण कारायवै याचे भान महाराष्ट्रातील विरोधी पक्षाला नसेल तर हे गंभीर आहे. सरकारने काही नियम ठेवले असतील तर राज्याच्या हितासाठी विरोधी पक्षाने विरोधाला विरोध करू नये. सत्ता येत नसल्याने एखाद्याला वैफल्य येऊ शकतं पण ते वैफल्य अशा टोकाला जाऊ नये की आपल्याच राज्यात आपल्याच लोकांचे बळी जावे आणि त्याचं भविष्यात राजकारण करण्यात यावे. इतकं टोकाचं राजकारण, इतकं क्रूर राजकारण महाराष्ट्रात आजपर्यंत कोणी केले नव्हते आणि करू नये अशा शब्दात संजय राऊतांनी भाजपावर घणाघात केला आहे.