Join us

त्यावेळी आम्ही रोज राजभवनात यायचो नाही; राष्ट्रपतींच्या उपस्थितीत राज्यपाल-मुख्यमंत्र्यांची टोलेबाजी  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2022 9:41 AM

आम्ही विरोधात होतो तेव्हा वर्षातून एखाद-दुसऱ्या वेळी यायचो. अगदी रोज काही यायचो नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मुंबई : आपल्या संविधानानुसार, ‘आम्ही भारताचे लोक’ हा देशाच्या सार्वभौमत्वाचा आधार आहे. दरबार हॉलचा हा उद्घाटन सोहळा मला भारतीय स्वातंत्र्य आणि लोकशाहीचा उत्सव वाटतो. जनता सर्वश्रेष्ठ आहे आणि राजभवनासह दरबार हॉलदेखील लोककल्याणकारी कामांचे प्रभावी केंद्र बनेल, असा विश्वास राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शुक्रवारी व्यक्त केला.

राजभवन येथे नव्याने उभारलेल्या दरबार हॉलचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती बोलत होते. राष्ट्रपतींच्या पत्नी सविता कोविंद, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. 

राष्ट्रपती म्हणाले की, पारतंत्र्याच्या काळात दरबार हा शब्द राजसत्तेशी जोडलेला होता. मात्र हा दरबार लोकशाहीशीच संबंधित आहे. लोकशाही व्यवस्थेतील सुशासनासाठी पारदर्शकता महत्त्वाची असते. दरबाराच्या व्यवस्थेत कोणतीही गोष्ट व्यक्तिगत व गोपनीय नसते. लोकप्रतिनिधीसुद्धा दरबारच्या माध्यमातून जनसंपर्कात राहतात. या नवीन संदर्भात हे नवे दरबार सभागृह नव भारताचे, नव महाराष्ट्राचे आणि चैतन्यमय लोकशाहीचे नवे प्रतीक आहे.

त्यावेळी आम्ही रोज राजभवनात यायचो नाही - मुख्यमंत्री

मुंबईतील राजभवन हे देशातील सर्वोत्तम राजभवन आहे. राजकीय हवा कशी असली तरी मलबार हिलचे वातावरण थंड असते, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत विरोधकांना चिमटे काढले. आम्ही विरोधात होतो तेव्हा वर्षातून एखाद-दुसऱ्या वेळी यायचो. अगदी रोज काही यायचो नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

दरबार हॉलचे समर्थ सभागृह व्हावे - राज्यपाल कोश्यारीदेशभरातील सर्व दरबार हॉलची नावे संत-महात्म्यांवरून ठेवायला हवीत. महाराष्ट्रात ‘समर्थ सभागृह’ नाव ठेवता येईल. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी यासंदर्भात पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी यावेळी केले. तसेच, अर्थमंत्री म्हणून अजित पवार कंजूष असले तरी दरबार हॉलच्या कामासाठी त्यांनी निधी कमी पडू दिला नसल्याचे राज्यपाल म्हणाले आणि नवा दरबार हॉलमध्ये हास्याची लकेर घुमली.

टॅग्स :उद्धव ठाकरेभगत सिंह कोश्यारी