Join us  

नवरी मंडपात, वऱ्हाडही पोहोचले; पण, वज्रमुठ सभेमुळे नवरदेवच अडकून पडला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2023 8:45 AM

मुंबईतील बीकेसी मैदानावर पोहोचवण्यासाठी सकाळपासून आपल्या चारचाकी गाड्यांमधून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आले होते

मुंबई - राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीतील एकजुट वाढली असून याच एकजुटीचा संदेश देण्यासाठी आणि सरकारविरुद्ध एकत्रितपणे आवाज उठवण्यासाठी वज्रमुठ सभांचा धडाका लागला आहे. छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि आता मुंबईतमहाविकास आघाडीने या सभा घेतल्या. मुंबईतील सभेतून ठाकरेंनी पुन्हा एकदा भाजपा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीकेचे बाण चालवले. तर, काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही भाजपला लक्ष्य केलं. या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. दुपारपासूनच मुंबईकर बीकेसीकडे निघाले होते. याच गर्दीत एका नवरदेवाची गाडी फसली अन् लग्नाचा मुहूर्तच टळला.  

मुंबईतील बीकेसी मैदानावर पोहोचवण्यासाठी सकाळपासून आपल्या चारचाकी गाड्यांमधून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आले होते. त्यामुळे, वाहतुकीची मोठी कोंडी संबंधित परिसरात झाली. या वाहतूक कोडींत एक नवरदेव अडकून पडला. त्यामुळे, त्याच्या लग्नाचा मुहूर्त हुकला आणि वाहतूक कोडींतून सुटका होईपर्यंत वाट पाहावी लागली. आशिष नावाचा युवक कलिना सांताक्रुझ येथे स्वत:च्या लग्नासाठी नवरदेव कारमधून निघाला होता. मात्र, ट्रॅफिक जाममुळे नवरदेव वेळेत लग्नासाठी पोहोचूच शकला नाही. लग्न मांडवात नवरी मुलगी आली होती, वऱ्हाडीही जमले होते, लग्नाचा मुहूर्तही आला पण नवरदेवच रेंगाळला. कारण, वज्रमूठ सभेमुळे नवरदेव बीकेसी येथील वाहतूक कोडींत अडकून पडला होता. 

पूल सोडल्यापासून आम्हाला हे ट्रॅफिक लागलं आहे, आमचे ड्रायव्हर म्हणाले की येथून शॉर्टकट आहे, पण हाच शॉर्ट कट लाँग कट ठरला आहे. आता, फोनवर फोन चालू आहेत, सगळेजण तिकडे आमची वाट पाहत आहेत, असा घडला प्रसंग नवरदेवाने माध्यमांशी बोलताना सांगितला. दीड तासांपासून आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलो आहोत, सर्वजण पोहोचले आहेत, फक्त नवरदेवच अडकला आहे. नशिब आम्ही मेकअप करुन आलो नव्हतो, असे म्हणत नवरदेवासोबत असलेल्या करवलींनी आपली पिडा सांगितली. 

टॅग्स :मुंबईलग्नशिवसेनामहाविकास आघाडी