'वर्षा'वरील स्नेहभोजनाला शिंदे गटाचे आ. संजय शिरसाट जाणार नाहीत; चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2022 11:52 AM2022-09-06T11:52:21+5:302022-09-06T11:52:55+5:30

मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात संजय शिरसाट यांना संधी देण्यात आली नाही. त्यामुळे शिरसाट नाराज असल्याचं गेल्या अनेक दिवसांपासून सांगण्यात येते.

At the dinner on 'Varsha' Bungalow by CM Eknath Shinde, Sanjay Shirsat will not go | 'वर्षा'वरील स्नेहभोजनाला शिंदे गटाचे आ. संजय शिरसाट जाणार नाहीत; चर्चांना उधाण

'वर्षा'वरील स्नेहभोजनाला शिंदे गटाचे आ. संजय शिरसाट जाणार नाहीत; चर्चांना उधाण

googlenewsNext

मुंबई - राज्यातील सत्तांतरात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शिंदे गटातील बंडखोर आमदारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून वर्षा बंगल्यावर स्नेहभोजनाचं निमंत्रण देण्यात आले आहे. या स्नेहभोजनाला सगळेच आमदार, मंत्री उपस्थित राहणार आहेत. परंतु शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट या स्नेहभोजनाला जाणार नाहीत. त्यामुळे विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे. 

मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात संजय शिरसाट यांना संधी देण्यात आली नाही. त्यामुळे शिरसाट नाराज असल्याचं गेल्या अनेक दिवसांपासून सांगण्यात येते. मुख्यमंत्री शिंदे यांनी शिरसाट यांनी नाराजी दूर करण्यासाठी दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारापर्यंत वाट पाहा असं आश्वासन दिले आहे. मात्र दुसरा मंत्रिमंडळ विस्तारही लांबल्याची चर्चा आहे. त्यात शिंदे गटातील आमदारांना एकत्र ठेवण्यासाठी त्यांच्यासोबत स्नेहभोजन करण्याची योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आखली. त्यात संजय शिरसाट जाणार नसल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या. 

याबाबत आमदार संजय शिरसाट म्हणाले की, मतदारसंघातील पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मला स्नेहभोजनाला उपस्थित राहणं शक्य नाही. त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पूर्वपरवानगी घेतली आहे. मुख्यमंत्र्यांच्या पूर्वपरवानगीनेच मी मतदारसंघातील कार्यक्रमांना हजेरी लावणार आहे. त्यामुळे नाराजी वैगेरे असं कुठे काहीही नाही. माध्यमांमधून गैरसमज पसरवण्यात येत आहेत. मी सोमवारीच वर्षा बंगल्यावर जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे असं शिरसाट यांनी सांगितले. 

तसेच स्नेहभोजनाबाबत सगळी चौकशी मी श्रीकांत शिंदे यांच्यासोबत भेटून केली. त्यामुळे तो कार्यक्रम आमचाच आहे. मी गेलो नाही म्हणून मोठं काहीतरी घडतंय असं नाही. इतके महत्त्वाचे असेल तर मी साडेसहाचं विमान पकडून मुंबईला जाईन. मी नाराज असल्याच्या बातम्या जर अशा येणार असतील तर मला स्नेहभोजनाला जावेच लागेल. नाराजीचा प्रश्न नाही. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत कुठलीही चर्चा नाही. त्यावर मी अधिकारवाणीनं बोलू शकत नाही. ज्यावेळेला विस्तार व्हायचा तेव्हा होईल. जो एकनाथ शिंदे निर्णय घेतील तो मला मान्य असेल असंही आमदार संजय शिरसाट यांनी सांगितले. 

Web Title: At the dinner on 'Varsha' Bungalow by CM Eknath Shinde, Sanjay Shirsat will not go

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.