राज्य सरकारचा यू-टर्न! अखेर कंत्राटी तहसीलदार नियुक्तीचे आदेश मागे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 08:19 AM2023-10-02T08:19:57+5:302023-10-02T08:20:12+5:30
जळगाव जिल्ह्यात कंत्राटी पद्धतीने तहसीलदार नियुक्त करण्याबाबत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.
मुंबई : कंत्राटी पद्धतीने तहसीलदार, नायब तहसीलदार नियुक्त करण्याबाबत प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीवरून टीका झाल्यानंतर ही जाहिरात रद्द करण्याचे आदेश महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. जळगाव जिल्ह्यात कंत्राटी पद्धतीने तहसीलदार नियुक्त करण्याबाबत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.
कंत्राटी पद्धतीने तहसीलदार भरण्याचे शासनाचे धोरण नाही. राष्ट्रीय प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी अनुभवी निवृत्त अधिकाऱ्यांना मदतीला घेतले जाते. मात्र त्याची जाहिरात प्रसिद्ध झाल्याने कंत्राटी पद्धतीने तहसीलदार भरले जाणार असा गैरसमज झाल्याचे स्पष्टीकरण जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. तत्काळ ती जाहिरात रद्द करा, अशा स्पष्ट सूचना जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना देऊन याबाबत सविस्तर खुलासा मागविल्याचेही विखे पाटील यांनी सांगितले. कंत्राटी तहसीलदार पदभरतीची जाहिरात ही कोणाच्या डोक्यातून आलेली सुपीक कल्पना होती, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.
दरम्यान, तीन ३दिवस महसूलमंत्र्यांना हा विषय महत्त्वाचा वाटला नाही का, त्यांना त्यांच्या खात्यात काय घडत आहे याची माहिती तरी आहे का? असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते- विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.