मुंबई - अटलबिहारी वाजपेयी यांची आज जंयती देशभर साजरी होत असून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांकडून अटलबिहारी वाजपेयींना आदरांजली वाहण्यात येत आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनीही अटलबिहारी यांच्या आठवणी जागवताना पंडित नेहरुंनंतर अटलबिहारी वाजपेयी हेच देशातील सर्वात लोकप्रिय नेते होते, असे संजय राऊत यांनी म्हटलं.
हिंदुत्वाच्या विचारधारेशी कधीही तडजोड न करता देशातील एकात्मता टिकली पाहिजे यासाठीच त्यांनी राजकारण केलं. धर्मांधता, जातंधता या दोन शब्दांना दूर ठेवूनही हिंदुत्वाचं राजकारण करता येतं, हे त्यांनी देशाला व जगाला दाखवून दिलं. बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचं अतिशय जवळचं नातं होतं. देशाचे प्रतप्रधान म्हणून ते बाळासाहेब ठाकरे यांच्याशी अनेक विषयांवर चर्चा करत होते, त्यांच्याशी सल्लामसलत करत होते. शिवसेना आणि भाजपा यांच्या युतीत अटलबिहारी वाजयेपी यांचं मोठं योगदान होतं, असे राऊत यांनी म्हटलं. तसेच, कारगिल युद्धात त्यांनी घेतलेल्या भूमिकेचीही आठवण संजय राऊत यांनी सांगितली.
पंडित नेहरुंच्या काळापासून ते संसदेत कार्यरत होते. पंडित नेहरु हे काँग्रेसचे प्रमुख नेते होते, देशाचे पंतप्रधान होते. तेव्हापासून अटलबिहारी यांचा राजकीय कार्यकाळ आहे. ते युवा खासदार असतानाही पंडित नेहरु त्यांचा सन्मान करत. अटलबिहारी हे संपूर्ण देशाचे नेते होते, ते कुठल्याही एका पक्षाचे किंवा विचारधारेचे नेते नव्हते. त्यामुळेच, पंडित नेहरुंनंतर देशाचे नेते असलेले ते एकमेव नेते होते, असे मी मानतो, असेही राऊत यांनी सांगितले.