मुंबई: काँग्रेसला पर्यायच नाही, अशी परिस्थिती असताना अनेक घटक पक्षांची मोट बांधत सरकार चालवले. काँग्रेसच्या पलीकडील एक राजकीय व्यवस्था देशाचा कारभार चालवू शकते ही खात्री त्यांनी देशाला दिली. सत्तेत आल्यावर त्यांनी कधीही सुडाचे राजकारण केले नाही. राजकीय शालीनता सोडली नाही, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्व. अटलबिहारी वाजपेयी यांना जन्मशताब्दीनिमित्त अभिवादन केले. जनसंघ ते भाजप अशा प्रवासात एकदा भाजप २ खासदारांवर येऊन थांबला होता. जनता पक्षाच्या सरकारमधला सहभाग सोडल्यास ४५ वर्षे विरोधी बाकांवर बसूनदेखील त्यांचा राजकीय आशावाद कमी झाला नाही. त्यांचा हा आशावाद आकर्षित करत आला आहे, असे ते म्हणाले.
राज्यपालांकडून अभिवादन
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी बुधवारी माजी प्रधानमंत्री दिवंगत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, राज्यपालांचे परिवार प्रबंधक जितेंद्र वाघ, राजभवनातील अधिकारी व कर्मचारी तसेच राजभवनातील पोलिस उपस्थित होते.