- मनोहर कुंभेजकर
मुंबई - उत्तर मुंबईत कांदिवली पूर्व येथे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची 98 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. येथील आकुर्ली मेट्रो स्टेशन समोरील श्री अटलबिहारी वाजपेयी सेंटर ऑफ एक्सलन्सच्या प्रांगणात असलेल्या वाजपेयी यांच्या प्रतिमेला उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांनी पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. स्थानिक खासदार गोपाळ शेट्टी यांच्या संकल्पनेतून येथे वाजपेयी यांचा भव्य पुतळा दि,13 ऑगस्ट रोजी उभारण्यात आला होता.
राम नाईक यांनी संसदेत वंदे मातरम् राष्ट्रगीत गायले पाहिजे या त्यांच्या मागणीला ३० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने खासदार गोपाळ शेट्टी,मुंबई भाजप अध्यक्ष व आमदार अँड.आशिष शेलार,स्थानिक आमदार अतुल भातखळकर आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत राम नाईक यांचा शाल, पुष्पगुच्छ, पुस्तक व स्मृतिचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला.यावेळी त्यांच्या हस्ते वाचनालयचे उद्घाटन झाले.
यावेळी राम नाईक म्हणाले की, राष्ट्रगीत वंदे मातरम सुद्धा संसदेत गायले जावे या आपल्या प्रस्तावाची आणि मान्यतेची त्यांनी सविस्तर माहिती दिली. वाजपेयी यांच्यासोबत काम करण्याचे सौभाग्य आपल्याला मिळाले. ३० वर्षांपूर्वी जेव्हा मी हा प्रस्ताव ठेवला तेव्हा संसद भवनात किंवा देशभरातील कोणत्याही शाळा व कॉलेजमध्ये राष्ट्रगीत गायले जात नव्हते. आणि आम्ही विरोध पक्षात असतानाही आमच्या या प्रस्तावाला एच.आर.डी. मंत्रालयाने मान्यता दिली.
खासदार गोपाळ शेट्टी म्हणाले की, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त संसदेत वंदे मातरम गीत गाण्याचा राम नाईक यांचा प्रस्ताव होता आणि या राष्ट्रगीताला ३० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल विशेष सन्मान झाला ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे.
अँड.आशिष शेलार म्हणाले की,उत्तर मुंबईत महापुरुषांचे सर्वाधिक पुतळे आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या अनेक लोककल्याणकारी योजनांचा पाया अटलबिहारी वाजपेयी यांनी घातला होता. किसान निधी योजनेचे त्यांनी स्मरण या वेळी केले. द्रुतगती मार्गाची सुरुवात त्यांनी केली तर आधुनिक शैक्षणिक धोरणाचे श्रेयही त्यांना जाते.तर वंदे मातरम हे राष्ट्रगीत संसदेत गायले जाते त्याचे संपूर्ण श्रेय राम नाईक यांना आहे.
आमदार अतुल भातखळकर म्हणाले की, वाजपेयीं यांचे स्मरण करणे म्हणजे आपला इतिहास आठवणे. ते हृदयात ठेवण्यासारखे आणि त्यांच्या प्रेरणेने काम करणारे व्यक्तिमत्व आहे. यावेळी आमदार योगेश सागर, आमदार मनीषा चौधरी, आमदार सुनील राणे, ज्येष्ठ नेते अँड.जयप्रकाश मिश्रा, श्रीकांत पांडे, आर.यु. सिंग, डॉ.योगेश दुबे, विनोद शेलार, उत्तर मुंबई भाजपचे अध्यक्ष गणेश खणकर प्रकाश दरेकर,उत्तर मुंबईचे माजी नगरसेवक, भाजप पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणेश खणकर यांनी प्रास्ताविक केले तर सूत्रसंचलन सुधीर शिंदे यांनी केले.