अटल सेतू आजपासून प्रवासासाठी खुला होणार; किमान २५० ते कमाल १५८० रुपये टाेल
By सचिन लुंगसे | Published: January 13, 2024 07:00 AM2024-01-13T07:00:59+5:302024-01-13T07:01:25+5:30
पुलाच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी तीन मार्गिका आहेत. पूर्व द्रुतगती मुक्तमार्ग हा सेतूला जोडला गेला आहे.
सचिन लुंगसे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: अटल बिहारी वाजपेयी शिवडी - न्हावा शेवा अटल सेतूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रार्पण करण्यात आले. हा ‘अटल सेतू’ शनिवार दि. १३ जानेवारीपासून सकाळी ८ वाजेपासून सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे, असे एमएमआरडीएच्यावतीने कळविण्यात आले आहे. ३१ डिसेंबर २०२४ पर्यंतच्या टोलदरानुसार येथून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना २५० रुपयांपासून १५८० रुपये एकेरी प्रवासासाठी मोजावे लागणार आहेत.
पुलाच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी तीन मार्गिका आहेत. पूर्व द्रुतगती मुक्तमार्ग हा सेतूला जोडला गेला आहे आणि पूर्व-पश्चिम असणारा वरळी-शिवडी उन्नतमार्ग हा भविष्यात अटल सेतू प्रकल्पास जोडला जाणार आहे. यामुळे मुंबई सागरी किनारा रस्त्याद्वारे (कोस्टल दक्षिण मुंबई आणि पश्चिम उपनगरातून येणाऱ्या प्रवाशांना विनाथांबा प्रवास करता येईल. हा सेतू विविध जोडरस्त्यांनी मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, वसई-विरार, नवी मुंबई, रायगडला जोडला जाणार असल्याने अंतर कमी होणार आहे.
बंद पडलेल्या वाहनांचे काय होणार?
सुरक्षेची बाब लक्षात घेऊन बंद पडलेली वाहने नेण्यासाठी स्वतंत्र आपत्कालीन मार्गिका, ॲण्टी-क्रॅश बॅरिअर्स असलेली कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ट्रॅफिक मॉनिटरिंग सिस्टम, पक्ष्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये ध्वनी अडथळे (साउंड बॅरिअर्स) लावण्यात आले आहेत.
- पुलाच्या दुसऱ्या बाजूला, शिवाजीनगर, उरण-पनवेल राज्य महामार्ग आणि मल्टीमॉडेल कॉरिडॉरवर चिर्ले येथे इंटरचेंज आहेत.
- याद्वारे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण, पुणे किंवा गोवा येथून वाहने मुंबईत प्रवेश करू शकतील.