Join us

"अंधार दूर झाला, सूर्य उगवला आणि कमळ फुलले' अटलजींचे शब्द खरे ठरले - हेमा मालिनी

By मनोहर कुंभेजकर | Published: December 26, 2023 7:02 PM

गतवर्षी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेला अटल सन्मान यंदा त्यांना मिळाल्याबद्दल हेमा मालिनी यांनी दीप कमल फाऊंडेशनचे आभार व्यक्त केले.

मुंबई-अभिनेत्री खा. हेमा मालिनी म्हणाल्या की, मला खूप मोठा सन्मान मिळाला आहे. अटलजींच्या नावाने मिळालेला हा सन्मान माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. अटलजींनी अचूक सांगितले होते की, आज अंधार दूर झाला, सूर्य उगवला आणि कमळही फुलले असे ठाम प्रतिपादन खासदार -अभिनेत्री हेमा मालिनी यांनी काल रात्री वांद्र्यात केले.यावेळी त्यांनी अटलजींच्या अनेक आठवणी सांगितल्या. गतवर्षी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेला अटल सन्मान यंदा त्यांना मिळाल्याबद्दल हेमा मालिनी यांनी दीप कमल फाऊंडेशनचे आभार व्यक्त केले.

मुंबई भाजपा उपाध्यक्ष अमरजीत मिश्रा यांच्या दीप कमल फाउंडेशन या संस्थेने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात मथुरेच्या खासदार, अभिनेत्री हेमा मालिनी यांना अटल सन्मान प्रदान करण्यात आला त्यावेळी त्या सत्काराला उत्तर दिले.यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, मुंबई भाजप अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार, कॅबिनेट मंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत हेमा मालिनी यांना संस्थेचे स्मृतीचिन्ह देवून वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा सभागृहात स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांना सन्मानित करण्यात आले.

माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांचा सुशासनाचा संकल्प पंतप्रधान नरेंद मोदी साकारत आहेत. भ्रष्टाचार संपवण्यासाठी अटलजी लढत राहिले, तो कायमचा संपवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढाकार घेत आहेत.  समाजातील शेवटच्या फळीतील लोकांचे दुःख दूर करण्यासाठी गरीब कल्याणसारख्या अनेक योजना राबविल्या जात आहेत असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केले. 

स्व. अटलजींच्या पंतप्रधानपदाच्या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही अटलजींच्या संवेदनशीलतेचे अनेक किस्से सांगितले. सुशासन दिन त्याचवेळी सार्थ ठरेल ज्यावेळी संपूर्ण देश अटलजींच्या आदर्श मार्गावर चालून त्याचे पालन करेल असेही ते म्हणाले.

मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा म्हणाले की, भारताची प्रगती पाहून अटलजींना आनंद झालाच असेल. 

मुंबई भाजपा अध्यक्ष, आ. ॲड. आशिष शेलार यांनी अटलजी हे खरे मुंबईकर असल्याचे सांगत अटलजी जिथे जात तिथे रमून तल्लीन व्हायचे असे म्हटले. अटलजींच्या मराठी भाषेवर असलेल्या प्रेमाचा उल्लेख करून ते म्हणाले की, अटलजींचे जीवन आपल्या सर्वांसाठी आदर्श आहे.

अटल महाकुंभचे संयोजक अमरजीत मिश्रा यांनी अटलबिहारी वाजपेयी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील साम्य रेखाटताना सांगितले की, अटलजींनी पोखरण अणुचाचणी करून भारताची स्थिती जगाला सांगितली होती, तर पंतप्रधान मोदींनी सर्जिकल स्ट्राईक करून नवा भारत किती सक्षम असल्याचे जगाला दाखवले. यावेळी  भोजपुरी चित्रपट अभिनेत्री स्मृती सिन्हा आणि मराठी चित्रपट अभिनेत्री आदिती सारंगधर यांनी अटलजींच्या कविता सादर केल्या. प्रसिद्ध निवेदिका स्मिता गवाणकर यांनी सूत्रसंचालन केले.

यावेळी माजी मंत्री राज पुरोहित, भाजप नेते किरीट भन्साळी, अलका पारेख यांच्यासह हिंदी, मराठी, भोजपुरी चित्रपट, नाट्य, साहित्य जगतातील मान्यवरांसह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :हेमा मालिनीअटलबिहारी वाजपेयीपंतप्रधानभारतभाजपा