दारूच्या नशेतील अथर्वच्या मदतीकडे रिक्षाचालकांचे दुर्लक्ष, सीसीटीव्ही फूटेजमधून स्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 05:20 AM2018-05-11T05:20:58+5:302018-05-11T05:20:58+5:30

गोरेगावातील आरे कॉलनीत मृतावस्थेत आढळून आलेल्या अथर्व नरेंद्र शिंदे या २० वर्षांच्या तरुणाच्या मृत्यूच्या नेमक्या कारणाचा उलगडा अद्याप पोलिसांना करता आलेला नाही.

Atharv Shinde Death News | दारूच्या नशेतील अथर्वच्या मदतीकडे रिक्षाचालकांचे दुर्लक्ष, सीसीटीव्ही फूटेजमधून स्पष्ट

दारूच्या नशेतील अथर्वच्या मदतीकडे रिक्षाचालकांचे दुर्लक्ष, सीसीटीव्ही फूटेजमधून स्पष्ट

googlenewsNext

मुंबई - गोरेगावातील आरे कॉलनीत मृतावस्थेत आढळून आलेल्या अथर्व नरेंद्र शिंदे या २० वर्षांच्या तरुणाच्या मृत्यूच्या नेमक्या कारणाचा उलगडा अद्याप पोलिसांना करता आलेला नाही. त्याच्या अंगावरील जखमा मारहाणीच्या आहेत की नशेत पडल्याने झाल्या, हे स्पष्ट झाले नसून त्याच्या तीन ते चार मित्रांना ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे.
एका पोलीस निरीक्षकाचा मुलगा असलेला अथर्व हा दारूच्या नशेत मदतीसाठी विनवणी करीत असताना अनेक रिक्षाचालकांनी त्याकडे दुर्लक्ष करीत भाडे नाकारले होते, हे परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फूटेजमधून आढळून आले आहे.
कांदिवली (पूर्व) परिसरातील ठाकूर व्हिलेज परिसरात राहत असलेल्या अथर्वचे वडील मुंबई पोलीस दलातील आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेत कार्यरत आहेत. तो ‘साउंड इंजिनीयरिंग’च्या तृतीय वर्षात शिकत होता. एका मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी तो आरेतील रॉयल पाम येथील बंगल्यात रविवारी गेला होता. बुधवारी त्याच्या मृतदेह आढळल्याने पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेºयाचे फूटेज मिळविले आहे, त्यामध्ये रविवारी संध्याकाळी ७.३०च्या सुमारास अथर्व पार्टीच्या ठिकाणाहून बाहेर पडल्याचे दिसते. मात्र, नशेमुळे त्याला नीट चालताही येत नव्हते. त्याने अनेक रिक्षावाल्यांना थांबवत ‘मुझे कांदिवली छोड दो’, असेही सांगितले. मात्र, त्याची अवस्था पाहून हा कोणी गर्दुल्ला असावा आणि आपले रिक्षाभाडे आपल्याला मिळणार नाही, असा विचार करत त्याला कोणत्याही रिक्षावाल्याने गाडीत बसवले नाही. त्यानंतर जंगलातील एका खड्ड्याजवळ तो नैसर्गिक विधीसाठी गेला. मात्र, उतार असल्याने तो तोल जाऊन चार वेळा पडला. त्यानंतर उठून उभे राहण्याचे त्राणही त्याच्यात राहिले नाही. जखमी अवस्थेत पडलेल्या अथर्वला परिसरातील स्त्री-पुरुषांनी पाहिले. मात्र, तो दारूच्या नशेत पडला असावा, असा समज करून त्याच्याकडे कोणीच लक्ष दिले नाही आणि अखेर त्याचा मृत्यू झाल्याचे सीसीटीव्ही फूटेजमध्ये आढळले आहे.
स्थानिकांनी याबाबत वेळेतच पोलिसांना कळविले असते, तर कदाचित त्याच्यावर उपचार होऊन त्याचे प्राण वाचले असते. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी पार्टीत सहभागी असलेल्या मित्रांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

गुप्तांगावर जखमा

अथर्वच्या शरीरावर विविध ठिकाणी जखमा होऊन त्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आहे. त्याच्या गुप्तांगालाही दुखापत झाली असून, त्यामुळे मृत्यू झाल्याचे सिद्धार्थ रुग्णालयातील डॉक्टरांकडून सांगण्यात आले. मात्र, या जखमा मारहाणीच्या आहेत की नशेत पडल्यामुळे, याची स्पष्टता झाली नसल्याचे तपास अधिकाºयांनी सांगितले.

बर्थडे पार्टीत पालकांचाही सहभाग
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,अथर्व ज्या पार्टीत गेला होता ती त्याच्या मैत्रिणीच्या एक बेस्ट फ्रेंडची होती. जी तिच्या वडिलांनी मुलगी १८ वर्षांची झाली म्हणून दिली होती. या पार्टीत सहभागी झालेल्या अनेक मुलांचे पालकही त्या ठिकाणी हजर होते. काही वेळाने मुलांना तिथेच सोडून ते निघून गेले. तर काहींनी रात्री उशिरा येऊन आपल्या मुलांना घरी नेले होते. अथर्व ७.३०च्या सुमारास घरी जात असताना त्याच्या मैत्रिणीने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो बंगल्याच्या गेटवरून उडी मारून खाली उतरला. त्याला रोखण्याच्या प्रयत्नात त्याची मैत्रीणही जखमी झाली. दोन दिवस खासगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर तिला डिस्चार्ज देण्यात आला.

Web Title: Atharv Shinde Death News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.