मुंबई : भाजपा शिवसेना युती होवो न होवो दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाकडून (आरपीआय) रामदास आठवले यांची उमेदवारी निश्चित झाली आहे, अशी घोषणा करत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिवसेनेच्या जागेवर रविवारी आपला दावा सांगितला. तर, आठवले यांच्या उमेदवारीची भाषा कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्याचा प्रकार असल्याचा पलटवार शिवसेनेचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांनी केला आहे.आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याची घोषणा करत नव्या चर्चेला तोंड फोडले होते. भाजपा शिवसेनेच्या जागावाटपात हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आला होता. मागील निवडणुकीत येथून शिवसेनेच्या राहुल शेवाळेयांनी काँग्रेसच्या एकनाथ गायकवाड यांचा पराभव केला होता. आठवले यांनी शिवसेनेच्या जागेवर दावासांगत रविवारी कार्यकर्त्यांची बैठकसुद्धा घेतली. चेंबूर जिमखाना येथे चेंबूर आणि अणुशक्तीनगर या परिसरातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आपण स्वत: या मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले. दक्षिण मध्य मुंबईतून निवडणूक लढविण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनीही सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असल्याचा दावा आठवले यांनी केला.मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा युती होती. यंदा मात्र युतीबाबत शंकाकुशंका व्यक्त केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर आठवले म्हणाले की, युती होवो अथवा न होवो या मतदारसंघातून मीच निवडणूक लढविणार. युती झाली नाही तर आरपीआयला सहकार्य करावे, या मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार उभा करू नये, या मागणीसाठी उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. मात्र, शिवसेनेने उमेदवार दिला तरी आरपीआयलाच यश मिळेल असा विश्वास व्यक्त करतानाच मतदारसंघाची चाचपणी झाली असून कार्यकर्ते कामाला लागले आहेत, असेही आठवले म्हणाले.मधल्या काळात आघाडीच्या राजकारणामुळे सातत्याने मतदारसंघ बदलावे लागले. सतत मतदारसंघ बदलल्यामुळे अडचणी येत असल्याचे लक्षात आले आहे. आपल्या हक्काचा मतदासंघ असायला हवा म्हणून दक्षिण मध्य मुंबईची निवड करण्यात आल्याचे आठवले म्हणाले. हा मतदारसंघ अल्पसंख्यांकांचा, दलित समाजाचा आहे, आरपिआयचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे आपला विजय निश्वित असल्याचे आठवले म्हणाले.>‘उद्धव ठाकरेच अंतिम निर्णय घेतील’मी स्वत: रामदास आठवले यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. त्यांनी असे विधान केले नसल्याचे स्पष्ट केले नसल्याचे सांगितले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्यासाठी अशा प्रकारची वक्तव्ये केली जातात. निवडणुका नजीक येथील तशी स्थिती बदलेल. निवडणुका अद्याप जाहीर झाला नसल्याने आठवले यांच्या विधानावर भाष्य करण्याची आवश्यकता नसल्याचे खासदार शेवाळे यांनी स्पष्ट केले. शिवसेनेच्या उमेदवारीबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच अंतिम निर्णय घेतील असेही शेवाळे म्हणाले.
शिवसेनेच्या जागेवर आठवले यांचा दावा, शिवसेनेचा मात्र पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2018 5:17 AM