श्रीकांत जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: उत्तर भारतीयांच्या झोपड्पट्टीतील घरांच्या पात्रतेसाठी, फेरीवाले, टॅक्सीवाले,कष्टकरी, कामगारांच्या रोजीरोटी, त्यांच्या अडीअडचणीत रिपब्लिकन पक्षाने मोठी साथ दिली आहे. त्यामुळे मुंबईतील उत्तर भारतीयांचा रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांचावर प्रचंड विश्वास आहे. या विश्वासाच्या नात्यामुळे उत्तर भारतीयांना आगामी निवडणुकीत उमेदवारी देण्याचा निर्णय रिपब्लिकन पक्षाने घेतला आहे. नवीन वर्षात ८ जानेवारीला रिपाइंच्या बोरिवली येथील उत्तर भारतीय संमेलनात त्याची घोषणा केली जाणार आहे.
शनिवार मुंबई मराठी पत्रकार संघात रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गौतम सोनावणे, उत्तर भारतीय आघाडी महाराष्ट्र अध्यक्ष श्यामधर दुबे, मुंबई अध्यक्ष हरिहर यादव, सरचिटणीस रमेश गौड यांनी माध्यमांशी संवाद साधला.
येत्या ८ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता बोरिवली पश्चिम गोराई गणेश मंदिराजवळच्या मैदानात उत्तर भारतीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षातर्फे उत्तर भारतीयांना उमेदवारी देण्याचे पक्षाध्यक्ष रामदास आठवले यांनी निश्चित केले आहे. महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा परप्रांतीयच्या मुद्दयावर उत्तर भारतीयांशी भेदभाव आणि अन्यायाचा, दहशतीचा, संकटांचा प्रसंग आला तेव्हा तेव्हा आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाने पुढे येवून उत्तर भारतीयांना जाहिर पाठिंबा दिला आहे. पक्षात उत्तर भारतीय आघाडीची स्थापना होऊन उत्तर भारतीय आघाडी चांगले काम करीत असल्याने हा निर्मण घेण्यात आल्याचे सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी सांगितले.